प्रभात वत्तसेवा बारामती/ सोमेश्वरनगर – पुढील आठवड्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आता कुठला निधी मिळणार नाही”, असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दरम्यान, पवार यांच्या वक्तव्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा फड आणखी तापणार असून राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील 64 व्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले की, “आठवड्यात निवडणूक जाहीर होतील. जो काही विकास झाला, तो आपण एकोप्याने राहिलो म्हणून झाला आहे. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही”, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. पवार म्हणाले की, “ऊस तोडणाऱ्या टोळ्यांनी आमची फसवणूक केली आहे, अशी निवेदने मला येत आहेत. पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आता कुठला निधी मिळणार नाही, असा सूचक संदेश पवार यांनी यावेळी दिला. मोर्चा आणि आचारसंहितेचीच चर्चा.. महाराष्ट्रात सध्या पक्षप्रवेश सोहळ्यांनी जोर पकडला आहे. प्रचंड घडामोडी सुरु आहेत. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला (दि.31) जानेवारीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश आहेत. त्यामुळे निवडणुका आगामी काळात जाहीर होऊ शकतात. पण विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगाच्या विरोधात शनिवार (दि. २) रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. विरोधकांनी मतदार याद्यांमधील घोळ सुधारण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोग कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष वेधले आहे. त्यातच उपमुख्यमंत्री पवार यांनी वक्तव्य केल्याने पुढील आठवड्यात निवडणुकीची आचारसंहिता लागणार का? यावर राज्यात चर्चेला उधाण आले आहे.