Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अकाली निधन झाल्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेने केवळ पवार कुटुंबीयांनाच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपद रिक्त झाल्याने आणि पक्षातील नेतृत्वाची जबाबदारी कोणाकडे येईल, याबाबत चर्चा सुरू झाली होती. आता या प्रकरणाला वेगळीच दिशा मिळाली आहे. आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे सर्व आमदार आणि ज्येष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीत एकमताने सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. याशिवाय त्यांना पक्षातील सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्याचे संविधानिक अधिकारही देण्यात आले आहेत. बैठकीत मांडले गेले दोन प्रमुख प्रस्ताव – पहिला प्रस्ताव: सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्याबाबत. – दुसरा प्रस्ताव: सुनेत्रा पवार यांना पक्षातील सर्व निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार देण्याबाबत. दोन्ही प्रस्ताव एकमताने मंजूर झाले. सुनेत्रा पवार यांच्या नावाची शिफारस ज्येष्ठ नेते दिलीप वालसे पाटील यांनी केली, तर छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. यामुळे अजित पवार यांच्या रिक्त जागेवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी आली आहे. Ajit Pawar सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रिपदाची शपथ विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार या आज सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. शपथविधी राजभवनात पार पडणार असून, त्यानंतर त्या राज्य मंत्रिमंडळात सामील होऊन पक्ष आणि सरकारची सूत्रे हाती घेतील. सुनेत्रा पवार सध्या राज्यसभा सदस्य आहेत, त्यामुळे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना विधानसभेत किंवा विधान परिषदेत प्रवेश घेण्यासाठी सहा महिन्यांची मुदत मिळेल. शरद पवारांचे (Sharad Pawar) विधान आणि विलीनीकरणावर प्रश्नचिन्ह दुसरीकडे, आज सकाळी राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी स्पष्ट केले की, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत त्यांना कोणतीही पूर्व माहिती नव्हती आणि यासंदर्भात त्यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच, दोन्ही राष्ट्रवादी गट १२ फेब्रुवारीला एकत्र येणार होते, असा दावा त्यांनी केला. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेला वेग आला होता. अनेक नेत्यांनी एकच राष्ट्रवादी असावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. आता सुनेत्रा पवार यांना गटनेतेपद आणि निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार मिळाल्याने, विलीनीकरणाबाबत अधिकृत निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे. शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार कोणता निर्णय घेतात? दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वळण लागले असून, पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यावर याचा मोठा परिणाम होईल.