Ajit Pawar – कोणीही बंदची हाक दिली नाही… कोणीही बंद करा असे सांगायलाही आले नाही… कुठलेही आंदोलन अथवा भय नाही… तरीही संपूर्ण शहर थांबलेले होते. सलग दुसऱ्या दिवशी शहरातील बहुतेक दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने बंद होती. अजितदादांच्या निधनाने व्यथित पिंपरी-चिंचवडकरांनी दुसऱ्या दिवशी देखील कडकडीत बंद पाळला. यात मोठ-मोठ्या शोरुमपासून रस्त्यावरील हातगाड्यांपर्यंत सर्वांचा समावेश होता. सलग दुसऱ्या दिवशी स्वयंस्फूर्तीने शहर बंद राहण्याची शहराच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असावी. शहरात कोणताही सोहळा अथवा कार्यक्रम झाला नाही. पूर्वनियोजित कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके शोकाकुल वातावरण पहावयास मिळत आहे.यापूर्वी करोनाकाळात अशा प्रकारे दुकाने बंद असायची परंतु दुकाने बंद ठेवण्यासाठी पोलिसांना बलप्रयोग करावा लागत होता. कोणत्याही पक्षाने अथवा संघटनेने बंद पुकारला की कार्यकत्र्यांना परिसरात फिरुन आणि धाक दाखवून दुकाने बंद करायला लागतात. अन्यथा तोडफोडीच्या भीतीने दुकानदार दुकाने बंद करतात. परंतु यापैकी काहीही घडलेले नसताना कुणीही बंदची हाक दिलेली नसताना किंवा कुणीही दुकाने, व्यवसाय बंद ठेवा, असे सांगायला देखील आलेले नसताना शहरातील सर्व लहान-मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवत आपले दु:ख व्यक्त केले. पिंपरी चिंचवड कडकडीत बंद शाळांमुळे वर्दळ रोजच्या तुलनेत रस्त्यावरील वर्दळ देखील खूप कमी झाली होती. काही शाळा सुरू असल्याने शाळांच्या परिसरातच पालकांची वर्दळ दिसत होती. बाकी इतर परिसरातील रस्त्यांवर रोजच्या तुलनेत खूपच कमी वर्दळ दिसून येत होती. काही शाळांमध्ये युनिट टेस्ट सुरू असल्याने पालकांना मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि आणण्यासाठी जावेच लागले. शोक व्यक्त करणारे फलक शहरात ठिकठिकाणी लहान-मोठे फलक लावत कार्यकत्र्यांनी आणि शोक व्यक्त केला. प्रत्येक फलक काहीतरी सांगत होता. दादांचे फोटो आणि फलकांवरील संदेश नागरिक आर्वजून पाहत होते. शहरात कायमच रस्ते, चौक फलकांनी गजबजलेले असतात. स्थानिक नेते स्वयंस्तुतीचे फलक उभारतात. परंतु या फलकांकडे नागरिक जास्त लक्ष देत नाहीत उलट या फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होते, अशी तक्रारही करतात. परंतु आज मात्र नागरिक आर्वजून फलक पाहत होते. दादांच्या वेगवेगळ्या छबींना निहाळत होते, त्यावरील संदेशही वाचत होते. सर्व कार्यक्रम-सोहळे रद्द अजितदादांच्या निधनाने शहरातील सर्व पूर्वनियोजित सोहळे, कार्यक्रम रद्द करण्यात आले. रोज कुठे ना कुठे वाढदिवस साजरे करणारे तरुण शहरात रोज दिसतात. परंतु गेल्या दोन दिवसांत असा एकही प्रसंग शहरात दिसला नाही. उलट वाढदिवस व इतर प्रसंगांसाठी हाॅटेल, रेस्टाॅरेंटमध्ये केलेली आगाऊ बुकिंग देखील रद्द करण्यात आली. अनेक केक्स आणि खाद्य पदार्थांच्या पूर्वी दिलेल्या आॅर्डर्स देखील रद्द करण्यात आल्या.