प्रभात वृत्तसेवा आळंदी – आगामी नगरपरिषद निवडणुकीत आळंदीच्या विकासाचा दिशादर्शक आराखडा मांडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना भरभरून साथ देण्याचे आवाहन केले. संत ज्ञानेश्वरांच्या पावन स्थळी झालेल्या आळंदी नगरपरीषद निवडणूकीच्या प्रचारसभेला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. पवारांच्या जोरदार भाषणाने प्रचारात चांगलीच रंगत चढली. पवार म्हणाले, आळंदी ही राज्यातील महत्त्वाची धार्मिक-सांस्कृतिक नगरी आहे. येथे दरवर्षी लाखो वारकरी, पर्यटक आणि भाविक येतात. अशा शहराचा विकास केवळ बोलण्याने होत नाही; त्यासाठी निधी, नियोजन आणि तंत्रज्ञानाधारित पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे यासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश कुर्हाडे हे सक्षम नेतृत्व आणि अनुभव संपन्न आहे. अजित पवार यांनी शहरातील दैनंदिन प्रश्नांवर भाष्य करताना त्यांनी पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेचे प्रश्न तातडीने सोडवण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. आळंदीतील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करणे, इंद्रायणी संवर्धन, घाट परिसराचा विकास, आरोग्य सुविधा, वारकरी भाविकांसाठी दर्शन बारी, मंदिर परीसर सुशोभिकरण, स्वच्छतेची सुधारणा आणि पर्यटक सुविधा हा आमचा प्राधान्यक्रम असेल, असे ते म्हणाले.