मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत बोलताना काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि अमित देशमुख यांच्याकडे पाहत, “राजकारणात माझं ऐकलं की फायदा होतो,” असं विधान केलं. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून, अजित पवारांनी या दोन्ही तरुण नेत्यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली होती का?, असा अंदाज बांधला जात आहे. अण्णा बनसोडेंच्या निवडीचं निमित्त – राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बुधवारी बिनविरोध निवड झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला, त्यावर बोलताना अजित पवारांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “2019 मध्ये अण्णा बनसोडेंना पक्षाने तिकीट नाकारलं होतं. पण मी मध्यरात्री 2 वाजता गुपचूप त्यांना एबी फॉर्म दिला. तेव्हा जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष होते. अण्णांनी माझं ऐकलं, फॉर्म भरला आणि 17 हजार मतांनी निवडून आले. आज ते उपाध्यक्ष झाले आहेत.” “माझं ऐकणाऱ्यांचं भलं होतं”- अजित पवार पुढे म्हणाले, “माझं ऐकलं तर राजकारणात फायदा होतो, हे अण्णांच्या उदाहरणावरून दिसतं. ते आता बऱ्याच जणांच्या लक्षात आले आहे.” यावेळी त्यांनी विश्वजित कदम आणि अमित देशमुख यांच्याकडे पाहत हसतमुखाने हात जोडले आणि म्हणाले, “विश्वजितजी आणि अमितजी, आपण नेहमी चर्चा करतो. पण यातली गंमत बाजूला ठेवा.” त्यांनी पुढे जास्त भाष्य करणं टाळलं. काँग्रेस नेत्यांना राष्ट्रवादीत खेचण्याचा प्रयत्न? अजित पवारांच्या या सूचक विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी विश्वजित कदम आणि अमित देशमुख यांना राष्ट्रवादीत सामील होण्यासाठी ऑफर दिली होती का?, असा तर्क लावला जात आहे. या दोन्ही काँग्रेस आमदारांचा खास उल्लेख आणि त्यांच्याकडे पाहून केलेलं वक्तव्य यावरून अजितदादांनी त्यांना पक्षात येण्याचं आमंत्रण दिल्याचा दावा केला जात आहे.