कोंढवा दुर्घटना : सर्व आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – अजित पवार

मुंबई – पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये अल्काॅन सोसायटीची संरक्षक भिंत ढासळल्याने गंभीर दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये सोसायटीच्या संरक्षक भिंतीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत झोपड्या करून राहिलेल्या कामगारांच्या झोपड्यांवर संरक्षक भिंतीचा मलबा पडल्याने १५ मजुरांचा मलब्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमध्ये दगावलेल्या मजुरांबाबत सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज विधानसभेतही याचे पडसाद पाहायला मिळाले.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कोंढवा दुर्घटनेतील सर्व आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अजित पवार म्हणाले की, ‘कोंढव्यात संरक्षक भिंत झोपड्यांवर कोसळून १५ मजुरांचा नाहक बळी गेला. बांधकाम नियमांकडे दुर्लक्ष हे पुण्यात विशेषतः कोंढव्यात अशा दुर्घटना घडण्यामागे मुख्य कारण आहे. यामध्ये महापालिका,राज्य सरकारची सुद्धा चूक आहे. जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.

‘त्या’ बांधकाम व्यावसायिकांना पोलीस कोठडी

दरम्यान, कोंढवा भागातील ऍल्कॉन स्टायलस सोसायटीची सीमाभिंत बांधकाम मजुरांच्या वसाहतीवर (लेबर कॅम्प) कोसळून 15 जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेस जबाबदार असल्या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या दोघा बांधकाम व्यावसायिकांना 2 जूनपर्यंत (मंगळवार) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.