परभणी : अजित पवारांना सत्तेसाठी आचार विचार काहीच नाही. पैसा कमावणे हाच अजित पवारांचा एकमेव उद्देश आहे. त्यामुळे त्यांनी एखादा व्यवसाय करावा, अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. सामाजिक न्याय आणि अजित पवारांचा काहीही संबंध नाही. एकाही ओबीसी वसतिगृहासाठी त्यांनी निधी दिलेला नाही असा आरोप लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर केला. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला लक्ष्मण हाके आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांमधील वाद संपायचे नाव घेत नाही. आज पुन्हा एकदा लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांना लक्ष करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परभणीच्या गंगाखेडमधील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यलायाला भेट दिली यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांचा पक्ष हा सरंजामांचा पक्ष आहे. अजित पवारांना सत्तेसाठी आचार विचार ध्येय धोरणे काहीही नाहीत. पैसे कमावणे हाच त्यांचा एकमेव उद्देश आहे. त्यामुळं त्यांनी एखादा व्यवसाय करावा असा सल्ला हाकेंनी अजित पवारांना दिला. गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हाके हे सतत्याने अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. अजित पवार हे शरद पवार यांच्या रिचार्जवर चालतात, आता अजित पवार यांना पंख फुटलेत. ते पोल्ट्री फार्म वाले आहेत. त्यांनी ओबीसींचा निधी अडवला अशी टीकाही लक्ष्मण हाके यांनी दोन-तीन दिवसांपुर्वी केली होती.