Pune District | अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत

बारामती, – श्रद्धा आणि सबुरी या साईबाबांच्या वचनाने मानवी जीवन सुंदर होत असताना समाजकारणात अजित पवार यांनी सुद्धा योगदान दिल्याने आणि श्रद्धा आणि सबुरी ठेवल्याने या वेळेस त्यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळावी, या विचाराने २०२४ चा पालखी सोहळ्याने साईबाबाच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी गुरुवार (दि.२८) बारामतीहून शिर्डीकडे प्रस्थान ठेवले.
१३ वर्षांपासून पालखी सोहळा करीत असताना व्यसनमुक्ती, सार्वजनिक वाचनालय, गुणवंत विद्यार्थी गौरव, स्पर्धा परीक्षांसाठी सहकार्य आदी उपक्रम पालखी सोहळ्यास जोडीला घेत असतो. यावर्षी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, हा संकल्प पूर्ण व्हावा म्हणून हजारो भक्तासमवेत साईचरणी प्रार्थना करणार असल्याचे आयोजक माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांनी सांगितले.बारामती ते शिर्डी असा पायी पालखी सोहळा साईच्छा सेवा ट्रस्टचे अध्यक्ष व बारामती नगरपरिषदचे माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे याच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित करण्यात येत असतो. यावर्षी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, या विचाराने पायी पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते.
या प्रसंगी माजी नगराध्यक्षा भारती मुथा, मुख्यधिकारी, प्रशासक महेश रोकडे, ज्येष्ठ माजी नगरसेवक किरण गुजर, अभिजित जाधव, अभिजित चव्हाण, सुधीर पानसरे, अविनाश बांदल, डॉ. सौरभ मुथा, दिनेश जगताप, शब्बीर शेख, शिर्डीचे मदन मोकाटे, जालिंदर सोनवणे, रमेश सोनवणे, तुषार थेटे, मंगेश चौधरी, मातंग एकता आंदोलनचे राजेंद्र मांढरे आदी मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ माजी नगरसेवक किरण गुजर म्हणाले की, डॉ. आंबेडकर वसाहतीचे रुपडे पालटले आहे. त्यामध्ये साई विचारांचा प्रभाव आहे. परिसरात साई भक्त वाढल्याने अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही इमारत उभी राहिली. बारामतीच्या वैभवात भर घालत असल्याचे त्यांनी सांगितले. भारती मूथा म्हणाल्या की, अध्यात्म व विकासकामे करताना बिरजू मांढरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी इतिहास नोंद घेईल इतके उपक्रम राबविले. तालुक्यात सर्वप्रथम साईबाबा पालखी सोहळा सुरू करण्याचा मान पटकाविल्याचे त्यांनी सांगितले.
पालखी सोहळ्यात वासुदेवची भूमिका करणारे राजेंद्र साळुंखे, पुजारी हरिभाऊ केदारी, हरीभाऊ गोंडे यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन अनिल सावळे पाटील यांनी केले. बिरजू मांढरे यांनी आभार मानले.
साईबाबांची कृपा; हक्काची घरे मिळाली
चिखलातून सुंदर फुलांच्या घरात म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतमधील हक्काचे घर मिळाल्याचा आनंद म्हणजे साईची कृपा.
– कमल आल्हाट, कचरावेचक कर्मचारी.
दिवाळीमध्येच स्वप्नातील हक्काचे घर मिळाल्याने साईबाबांच्या विचारांची दिवाळी घरात साजरी केली आहे. याचा मला आनंद होत आहे.
– गणेश शिंदे, स्वच्छता कर्मचारी, बारामती.





