Ajit Pawar – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे परिसरात शोककळा पसरली आहे. या धक्कादायक घटनेचे पडसाद उमटत असतानाच ग्रामस्थांनी आणि व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली. गावातील सर्व बाजारपेठ, लहान-मोठी दुकाने, व्यापारी आस्थापने आणि कृषी उत्पन्न उपबाजार समितीचे कामकाज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले.तसेच शाळा आणि महाविद्यालयांनाही तात्काळ सुट्टी जाहीर करण्यात आली. या शोकाकुल वातावरणात रस्त्यांवरील नेहमीची वर्दळ कमी झाली असून, ठिकठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले आहेत. श्रीक्षेत्र टाकळी भिमा येथे युवा नेते राहुल करपे यांनी ग्रामस्थांना एकत्र करून श्रद्धांजली वाहिली. अजित पवार यांनी राज्याच्या आणि विशेषतः शिरूर तालुक्याच्या विकासासाठी घेतलेले निर्णय आणि त्यांचे प्रभावशाली नेतृत्व सदैव स्मरणात राहील, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. प्रशासकीय आणि सामाजिक संघटनांनीही एकत्र येत त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली. आज तळेगावात शोकसभा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त आज तळेगाव ढमढेरे येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज सकाळी १० वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरेच्या विकासकामात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. “संघाच्या ४० वर्षांच्या माझ्या कुटुंबाच्या प्रवासात मला चेअरमनपदाची संधी देऊन अजितदादांनी संघविकासाची मोठी जबाबदारी सोपवली. हा विश्वास मी कायम स्मरणात ठेवेन. धाडसी निर्णय, कामाची गती आणि शेतकरी-सामान्य माणसाशी जोडलेले त्यांचे नेतृत्व कायम प्रेरणादायी राहील. त्यांच्या आकस्मिक जाण्याने महाराष्ट्राने एक प्रभावी नेतृत्व गमावले आहे. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.” – ॲड. स्वप्नील ढमढेरे, चेअरमन, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ “पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी माझ्यासारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन अजितदादांनी माणसावरचा विश्वास काय असतो, हे दाखवून दिलं. त्यावेळी मोठी पदं आणि प्रस्थापित चेहरे बाजूला ठेवून त्यांनी सामान्य कार्यकर्त्याला सहकार क्षेत्रातील उच्च पातळीवर नेलं. ही केवळ नियुक्ती नव्हती, तर कार्यकर्त्याच्या कष्टाला आणि निष्ठेला मिळालेली दाद होती. दादांचं हे नेतृत्व कायम मनात घर करून राहील.” – बाळासाहेब नरके, माजी उपाध्यक्ष पुणे जिल्हा बँक “शिरूरच्या विकासात दादांचा मोलाचा वाटा होता. किसनभाऊ भुजबळ आणि दादांचे नाते अतूट होते. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील महिलेला नेतृत्वाची संधी देणारे दादा, तो विश्वास मी कधीच विसरू शकत नाही.” – आरती भुजबळ, माजी सभापती शिरूर पंचायत समिती “राज्याच्या कुटुंबाचा शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष प्रमुख अचानक हरपल्याने राज्यावर मोठा आघात झाला आहे. ही केवळ एक नेता गेल्याची नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राची भरून न निघणारी हानी आहे.” – राहुल गव्हाणे, अध्यक्ष, पुणे जिल्हा पदवीधर संघ, भाजपा “फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा धर्मनिरपेक्ष लोकनेता हरपला. दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचं नेतृत्व पोरकं झालं. ही हानी कधीही भरून न निघणारी आहे.” – महेश ढमढेरे,उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पुणे जिल्हा