बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर भाजपच्या गोटात जाऊन उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांनी बारामतीत पहिल्यांदाच हजेरी लावली. बारामतीकरांनी त्यांचे जंगी स्वागत केले. रस्त्यावर तसेच चौकाचौकात हजारो बारामतीकरांनी अजित पवार यांच्यावर पुष्पवृष्टी केली. स्वागतासाठी शहर व तालुक्यातील नागरिकांनी तुफान गर्दी केल्याने बारामतीत अजितदादांचीच हवा असल्याचे स्पष्ट झाले.
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत आल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी अवघ्या चार दिवसांच्या कालावधीत हटके आयोजन करत अजित पवार यांचे बारामतीकरांनी जंगी स्वागत केले.अजित पवार यांचे बारामतीकरांनी केलेल्या भव्य स्वागत म्हणजे त्यांना बारामतीकरांनी दर्शवलेला पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
अजित पवार यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव पार्थ पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादीची शहराध्यक्ष जय पाटील, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. कार्यकर्ते, नागरिक, व्यापारी, संस्था व संघटनांच्या पदाधिका-यांनी त्यांचे हार, बुके देत व फुलांची उधळण करत स्वागत केले.
ठिकठिकाणी नागरिकांनी त्यांना हार घालून स्वागत केले. जेसीबी मशीनच्या मदतीने अनेक ठिकाणी त्यांच्यावर फुलांची उधळण केली गेली. क्रेनद्वारेही त्यांना हार घातले गेले. अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ व संजीवनी ग्रुपने त्यांच्या स्वागतासाठी क्रेनद्वारे हार घालण्याची व्यवस्था केली होती.यावेळी कार्यकर्त्यांनी एकच वादा अजित दादा.. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.
अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर बँड, ढोलपथकाच्या साथीने त्यांची मिरवणूक काढली गेली. संतोष गालिंदे व सहका-यांनी मशीनच्या सहाय्याने अजित पवार यांच्यावर दोन टनांहून अधिक फुलांची उधळण केली. मिरवणूकीच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी व फ्लेक्स लावून व्यापारी वर्गाने पवार यांचे स्वागत केले.
तालुक्याच्या विविध भागातून तरुण दुचाकी रॅली काढून बारामतीच्या शारदा प्रांगणात दाखल झाले होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, युवकाध्यक्ष अविनाश बांदल यांच्यासह अनेक सहका-यांनी या सत्कार सोहळ्याचे नियोजन केले होते.