Ajit Pawar Plane Crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. अपघाताच्या आदल्या दिवशी अजितदादांना आलेल्या शेवटच्या फोन कॉलविषयी चर्चा रंगली होती. या कॉलमुळे त्यांना बारामतीला जाण्यास उशीर झाल्याचा दावा करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित करत, “तो फोन नेमका कोणाचा होता आणि कशासाठी केला होता?” असा सवाल केला होता. तसेच विमानाच्या पायलटवरही संशय व्यक्त करत घातपाताचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, आता या चर्चेला पूर्णविराम देत प्रफुल्ल पटेल स्वतः माध्यमांसमोर आले आहेत. त्यांनीच अजित पवार यांना शेवटचा फोन केल्याची कबुली दिली आहे. पटेल यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या बोनस आणि शेतीसंदर्भातील विषयावर चर्चा करण्यासाठी त्यांनी अजितदादांना फोन केला होता. “अनेकजण माझ्या फोन कॉलबाबत वेगवेगळे आरोप करत आहेत. मात्र मी शेवटचा फोन शेतकरी विषयावरच केला होता. मला त्या वेळी दादा कुठे होते, याची माहिती नव्हती,” असे पटेल यांनी स्पष्ट केले. अपघाताची सखोल चौकशी व्हावी, हीच आपली भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. अपघातानंतर या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून राज्य सरकारनेही चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून या अपघातामागील नेमके कारण काय, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.