पिंपरी : शहरामध्ये नऊ वर्ष ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी स्वतःची घरे भरली आहेत. महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करत दादागिरी केली आहे. यांना पैशांची मस्ती आणि सत्तेची गुर्मी आहे. हे कारभारी आता बदलायला पाहिजे. ज्यांनी महापालिकेत भ्रष्टाचार केला आहे, त्या भ्रष्टाचाराचा आका संपवायचा असून त्यांना त्यांची जागा दाखवायची असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील भाजप आमदारांवर जोरदार टीका केली. महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रावादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील पिंपरी, वाल्हेकरवारी येथे प्रचार सभा झाल्या. यावेळी पवार यांनी महापालिकेतील भाजपच्या सत्ताकाळात झालेल्या कारभारावरून भाजपच्या आमदारांचे न घेता गंभीर आरोप केले. पिंपरीत बोलताना पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात अनेक विकासकामे केली. भामा-आसखेडच्या पाण्यासाठी प्रयत्न केले. रस्ता रुंदीकरण केले. आपला महापौर असताना देशामध्ये शहराचा पहिला क्रमांक आला. २०१७ पर्यंत पारदर्शक कारभार सुरू होता. मात्र, त्यानंतर काय परिस्थिती झाली हे सगळ्यांनी पाहिले आहे. २०१५-१६ ला चार हजार कोटी ठेवी होत्या त्या वाढत जाऊन आतापर्यंत १० हजार कोटी ठेवी असणे आवश्यक होत. मात्र, आता फक्त २ हजार १३२ कोटी आहे. याला जबाबदार कोण? मी प्रत्येक पंचवार्षिकनंतर तुमच्या समोर येऊन लेखाजोखा द्यायचो. आज शहरात दादागिरी सुरू आहे. कामांमध्ये रिंग सुरू आहे. अधिकाऱ्यांवर दबावाच राजकारण सुरू आहे. शहरात कधी वाहतूककोंडी होत नव्हती. आता शहरं वाहनांनी तुंबलं आहे. नको तिथे पैसा खाल्ला, कुत्र्यांच्या नसबंदीमध्ये भ्रष्टाचार? काही जनाची नाही तर मनाची ठेवायला हवी. पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटीच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. केबलचे काम, ई-क्लासरुमच्या कामात देखील भ्रष्टाचार केला आहे. लोकांची सहनशीलता कधीपर्यंत बघणार. एका आमदारांच्या पुत्राला स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले. त्यालाचा लाच घेताना पकडले. यात शहराचे नाव खराब झाले. माझ्या विचाराच्या उमेदवारांना नगरसेवक करा. सगळा कारभार पारदर्शक होईल असे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले. वाल्हेकरवाडी येथे बोलत असताना पवार म्हणाले, मी कोणाच्या नादी लागत नाही. मला कोणी अरे केलं तर मी कारे करतो. शहरामध्ये पार्किंच्या समस्या वाढायला लागली आहे. अनधिकृत बांधकामे, उच्चदाब विद्युतवाहिनीच्या घऱांना नोटीसा आल्या आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. ज्यांच्या हातात कारभार आहे, ते रिंग करून पैसे कमवतात. त्यांना पैशांची मस्ती आली आहे. यांना कोणी अडवले तर दादागिरी करतात. नऊ वर्षात यांनी नुकसान केल म्हणून यांना बाजूला करायच आहे. हे कारभारी आता बदलेले पाहिजे, हे आता घरदार भरायला लागलेत. काकांच्या पुण्याईने सगळ व्यवस्थित आहे मी उभे केलेल्या प्रामाणिक लोकांकडून मला काही अपेक्षा नाही. काकांच्या पुण्याईने माझ खूप बर चाललयं. गळ्याशपथ खोट सांगत नाही. पण काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुढे आणलं पाहिजे असे सांगत अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. स्थानिक नेत्यावर तोफ ज्याच्या हातात २०१७ पासून कारभार होता त्याला मी नगरसेवक केलं होतं. त्याला स्थायी समितीचं अध्यक्षपद दिलं. त्यामध्ये विलास लांडे यांना कोणती अडचण नको म्हणून ते दिलं होतं. या पठ्ठ्याने त्या स्थायी समितीतच काय करायचं ते केलं. पुढे लांडेंच्याविरोधात निवडून आला. आज काय प्रॉपर्टी झाली आहे. कोठून आला एवढा पैसा असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर तोफ डागली.