Ajit Pawar – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने खेड तालुका, पुणे जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे. लाखो कार्यकर्त्यांचे भवितव्य अधांतरी राहिले असून दादांची स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे. आता रडायचे नाही, लढायचे आहे. अजित दादांची स्वप्ने साकार करायची आहेत, असे भावनिक आवाहन खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले. राजगुरुनगर येथे आम्ही राजगुरुनगरकर यांच्या वतीने आयोजित शोकसभेत ते बोलत होते. यावेळी आमदार बाबाजी काळे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा मोहिते, शिवसेना महिला जिल्हा संघटक विजया शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा राक्षे, महिला उपाध्यक्षा कांचन ढमाले, तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, तालुका महिला अध्यक्षा संध्या जाधव, पंस माजी सभापती अंकुश राक्षे, अॅड. मनिषा टाकळकर, सुभाष होले, उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर, नगरसेवक सागर सातकर, वैभव घुमटकर, मित्रसेन डोंगरे, राहुल आढारी, राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, माजी अध्यक्ष किरण आहेर, विद्यमान उपाध्यक्षा अश्विनी पाचारणे, संचालक विनायक घुमटकर, माजी जिप सदस्या मंगल चांभारे, अजय चव्हाण, बापू चौधरी, रज्जाक शेख, संतोष भांगे, शुभम सोनवणे, सतीश राक्षे, पप्पू टोपे, पूजा थिगळे, माऊली वाफगावकर, रेखा क्षोत्रीय, भाजपच्या दिप्ती कुलकर्णी, किशोर कुमठेकर, मनसेचे नितीन ताठे, अॅड. दीपक थिगळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.माजी आमदार दिलीप मोहिते पाटील पुढे म्हणाले, अजितदादांचे कार्य सर्वसामान्य माणसासाठी होते. सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी निर्णय घेतले. त्यांच्या निर्णयांमुळे सामान्य माणूस सुखी होत होता. राजगुरुनगर : येथे आम्ही राजगुरुनगरकर आयोजित उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या शोकसभेत मार्गदर्शन करताना माजी आमदार दिलीप मोहिते पाटील. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख यांच्यानंतर आता अजितदादांसारखे कर्तृत्ववान नेतृत्व नियतीने वेळेआधी हिरावून घेतले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही.अॅड. मुकुंद आवटे म्हणाले, दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांची विचारशक्ती, वक्तशीरपणा आणि आकलनक्षमता अलौकिक होती. तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा संध्या जाधव म्हणाल्या, अंगावर खादी आणि हातावर कामांची यादी असे नेतृत्व पुन्हा होणे अशक्य आहे. राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे म्हणाले, सर्वसामान्य माणसाला स्वतःहून ओळखणारे अजितदादांसारखे नेतृत्व पुन्हा होणार नाही. त्यांचा प्रगल्भ विचार आज राज्याला नक्कीच कमी पडणार आहे.माजी अध्यक्ष किरण आहेर म्हणाले, अजितदादांनी राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अडचणी सोडवल्या. सहकार क्षेत्रातून त्यांनी बँकेला मोठी मदत केली. समाजाभिमुख नेता आज आपल्यातून निघून गेला आहे. शिवसेना महिला जिल्हा संघटक विजया शिंदे म्हणाल्या, पुणे जिल्ह्याला पुढे नेणारा नेता म्हणजे अजितदादा होते. पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात पवार कुटुंबाचा मोठा वाटा आहे.तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर म्हणाले, गेली 35 वर्षे दादांच्या सानिध्यात काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी खेड तालुक्याचा चेहरामोहरा बदलला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देणे हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल. जिल्हा उपाध्यक्ष बाबा राक्षे म्हणाले, दादांच्या निधनाने सह्याद्रीही शोकसागरात बुडाला आहे. आम्ही दादांचे होतो, आहोत आणि राहणार आहोत. त्यांची स्वप्ने साकार करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. शोकसभेत अनेकजण भावनावश झाले. साश्रू नयनांनी उपस्थितांनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली. “महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत दरारा निर्माण करणारे नेतृत्व म्हणून अजितदादांची ओळख होती. सभागृहात आता आपल्या हक्काचा नेता दिसणार नाही याची खंत कायम राहील. केवळ राष्ट्रवादी काँग्रेसलाच नव्हे तर सर्व पक्षीयांना आणि राज्यातील जनतेला अजितदादांची गरज होती. पुणे जिल्ह्याच्या विकासामागे पवार कुटुंबाचा मोठा वाटा आहे.” – बाबाजी काळे, आमदार