Ajit Pawar Mother : “माझ्या देखतच मुलाने मुख्यमंत्री व्हावं..”; अजित पवारांच्या आईने व्यक्त केली भावना

Ajit Pawar Mother : राज्यात आज २३५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. २० हजारपेक्षा अधिक जागा तसेच तीन हजार पोटनिवडणुका अशा एकूण सुमारे २५ हजार जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. मतदानाला राज्यभर सुरुवात झाली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी अजित पवार यांच्या मातोश्रींनी त्यांची एक इच्छा बोलून दाखवली.
मतदान करून आल्यानंतर मातोश्री आशाताई पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. याविषयी बोलताना आशाताई म्हणाल्या,“अजित पवार आजारी असून त्यांना अशक्तपणा आला आहे. त्यामुळे ते मतदानासाठी येऊ शकले नाहीत. १९५७ सालापासून मी मतदान करतेय. पूर्वी सुरुवातीला काटेवाडीत काहीच नव्हतं. पण माझ्या सुनेमुळे काटेवाडीत भरपूर बदल झाले”, असे आशाताई पवार यांनी यावेळी म्हटले
तसेच पुढे बोलताना, “अजित पवारांवर लोकांचं प्रेम आहे. पण पुढचं काय सांगता येतं? सर्वांना वाटतं की दादांनीच मुख्यमंत्री व्हावं. माझं वय आता ८६ वर्षे आहे, त्यामुळे माझ्या देखतच (माझ्या हयातीत) मुलाने मुख्यमंत्री व्हावं. बारामती आपलीच आहे, लोकांचंही दादांवर प्रेम आहे, आता पाहुयात”, असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, आज राज्यभरात २३५३ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. यापैकी काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत. त्याची नक्की आकडेवारी उपलब्ध नव्हती. पण २३५३ ग्रामपंचायतींमध्ये एकूण २०,५७२ जागा आहेत. या सर्व २३५३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचीही थेट निवडणूक होत आहे. याशिवाय २०६८ ग्रामपंचायतींमधील रिक्त २९५० जागांसाठी पोटनिवडणूक आजच होणार आहे. रिक्त असलेल्या १३० सरपंचपदासाठीही पोटनिवडणूक होत आहे. नक्षलग्रस्त भाग वगळता राज्यातील अन्य ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी सोमवारी होईल. तर नक्षलग्रस्त भागांमध्ये मंगळवारी मतमोजणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.





