मुंबई – मुंबई पालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने पालिका मुख्यालयात हेरिटेज वॉक सुरू करण्यात येईल. मुंबईकर व पर्यटकांना या पुरातन वास्तूची सफर घडविणाऱ्या उपक्रमाची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यंटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्सासह अनेक नेते उपस्थित होते. मात्र अजित पवार यांनी आदित्य यांचा उल्लेख आपले लेक म्हणून केल्याने हा कार्यक्रम विशेष चर्चेत आला आहे.
१९९० पासून विधिमंडळात आहोत, मात्र कधी पालिका मुख्यालयात येण्याचा योग आला नाही. शेवटी लेकाने इमारतीत आणले, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले. तसेच हेरिटेज वॉकला मराठी नाव शोधावे, असेही पालिकेला ठणकावले. यावेळी अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांना काही सूचना केल्या.
मुंबईतील फुटपाथवरच्या टपऱ्या हटायला हव्यात, शहरात बकालपणा दिसणार यावर काम करायला हवं आणि यात युवा पिढीनं पुढाकार घेऊन काम करावं”, असा सल्ला अजित पवार यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना देऊ केला आहे. मुंबईचं नाव जगात घेतलं जात. पण फुटपाथवर कुठंही कुणीही बसलंय, अनधिकृत बांधकाम करतंय, टपऱ्या सुरू करतंय हे बंद व्हायला हवं, असं अजित पवार यांनी म्हटलं.