प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – मी तुम्हाला लाल दिवा द्यायचं ठरवलं होतं. पण तुम्ही माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना संधी दिली नाही, आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदासह सर्व नगरसेवकांना निवडून द्या राजगुरूनगर शहराचा समतोल सर्वांगीण विकास करू. असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजगुरुनगर येथे केले. राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राजगुरुनगर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांची विजयी संकल्प सभा झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बाबा राक्षे, जि. प. माजी सदस्य अरुण चांभारे, तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, ज्येष्ठ नेते शांताराम घुमटकर, अश्विनी पाचारणे, सागर सातकर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किरण आहेर, नगरसेवक पदाचे उमेदवार संपदा सांडभोर, बाळासाहेब सांडभोर, स्नेहल राक्षे, निलेश गवते, शंकर राक्षे, कल्पना सांडभोर, संतोष सांडभोर, श्वेता कानसकर, मीनाक्षी भांगे, वैभव घुमटकर, सुप्रिया घुमटकर, हेमंत खांगटे, मेघा कौदरे, मित्रसेन डोंगरे, तन्मय पाचारणे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अजित पवार म्हणाले, राजगुरूनगर शहराला लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून नवीन पाणी योजना केली जाईल. जिल्ह्याबद्दल मला प्रेम आहे. मी तुमच्या जिल्ह्यातील आहे. त्यामुळे आपणच सर्व काही करणार आहोत येथे कोणी येईल आणि काहीही सांगेल त्यांच्यावर भरवसा ठेवू नका. चाकणपर्यंत आलेली मेट्रो राजगुरुनगरपर्यंत आणू शकतो त्यासाठी तुम्ही माझे ऐका मी तुमचे ऐकतो. राजगुरूनगरचा पाणी, कचरा, पार्किंगचा प्रश्न मार्गी लावू. वाहतूक कोंडी सोडवली जाईल. राज्यात चार वर्षे सरकारला बाकी आहे. जे जे प्रश्न आहेत ते सोडवले जातील केंद्रात साडेतीन वर्षे आहे. त्यामुळे सरकार आमचे आहे. त्याकरिता सर्वानी साथ द्या राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार विजयी करा असे आवाहन पवार यांनी केले.आमदार दिलीप मोहिते म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री हे पुण्याचे पालकमंत्री, अर्थमंत्री अजित पवार हे आहेत. राजगुरुनगर शहराला विकासाच्या वाटेवर आणायचे असेल तर राजगुरुनगर नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात द्या. राष्टवादीची सत्ता आणा. नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा द्या. राजगुरूनगरचा प्रपंच व्यवस्थित चालवणारे नेतृत्व किरण आहेर यांच्या रूपाने निवडून द्या त्यांना साथ देण्यासाठी सर्व नगरसेवकांना निवडून द्या राजगुरूनगरचा विकास करा. यावेळी कैलास सांडभोर, शांताराम घुमटकर यांनी मनोगत व्यक्त केले. “राजगुरुनगर शहरातील पाणी, कचरा सांडपाणी कर वाढ आदी समस्या प्रलंबित आहेत. हे प्रश्न सुटले नसल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. शहराचा विकास करताना माजी आमदार दिलीप मोहिते यांनी अनेक विकास कामे केली. शहराची ओळख खेड पुरती नाही तर ती राज्यात पोहचण्यासाठी प्रयत्न केली जाईल.” -किरण आहेर, नगराध्यक्षपदाचे उमेदवार