१) नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष राज्यातील २८८ नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी २ डिसेंबर आणि २० डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान पार पडलेलं पालिका निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला असून निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर शिंदेंच्या शिवसेनेला दुसऱ्या क्रमकांच्या सर्वाधिक जागा मिळाल्यात. तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा फटका बसलाय. या निवडणुकीत भाजपला १२० शिंदेंच्या शिवसेनेला ६० तर अजित पवारांच्या राष्ट्रावादीला ३६ जागांवर यश मिळालंय… महाविकास आघाडीत काँग्रेसला ३०, ठाकरेंच्या शिवसेनेला ९ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ९ ठिकाणी विजयाचा गुलाल उधळता आलाय… निकालाचे एकूण चित्र पाहता २८८ पालिकांपैकी महायुतीच्या ताब्यात २१७, तर महविकास आघाडीला ४८ ठिकाणी यश मिळालंय. २३ पालिकांमध्ये स्थानिक आघाड्यांनी बाजी मारलीये. भाजपचं नंबर १ पक्ष; देवेंद्र फडणवीसांची निकालावर प्रतिक्रिया २) नगर परिषद निवडणुकीतील महायुतीच्या घवघवीत यशानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिलंय. २०१४ पासून भाजपचा वरचष्मा कायम असून ग्रामीण भागातही पक्षाची पकड मजबूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. फडणवीस म्हणाले की, २०१४ नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत भाजपने शहरांपासून गावांपर्यंत विजय मिळवला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जागा कमी झाल्या असल्या, तरी भाजपची मते कमी झालेली नाहीत. ग्रामीण भागातही मतदारांनी भाजपला मोठी पसंती दिल्याचं फडणवीस यांनी म्हटलेय. तसेच एकनाथ शिंदेनी देखील निवडणुक निकालांबद्दल आपली प्रतिक्रिया दिलीय. जसे लोकसभेत महायुतीला प्रचंड यश मिळालं, विधानसभेत देखील मोठा विजय मिळाला, तसेच नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांमध्ये देदीप्यमान यश मिळालंय. या निवडणुकीत भाजपने सेंच्युरी मारलीय तर शिवसेनेने हाफ सेंच्युरी क्रॉस केलीय. कमी जागा लढवून जास्तीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या जागा जिंकल्यात, असं शिंदेनी म्हटलंय. ३) २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे बनली नगराध्यक्ष सोलापूर जिल्ह्यातील मोहळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ने अभूतपूर्व विजय मिळवत आपला झेंडा फडकवलाय. या निवडणुकीत २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या असून, त्या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या नगराध्यक्ष बनल्यात. तसेच, त्या मोहळच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मानही त्यांनी मिळवलाय. आपल्या विजयानंतर सिद्धी वस्त्रे यांनी मोहळच्या मायबाप जनतेचे मनःपूर्वक आभार मानलेत. जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली, यासाठी मी कृतज्ञ आहे. प्रचारादरम्यान माझ्यावर आणि पक्षावर अनेक टीका झाल्या, मात्र विजयाने या टीकेला सडेतोड उत्तर दिलय. तसेच मोहळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी रमेश बारसकर आणि उमेश दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे वस्त्रे यांनी सांगितलंय. ४) लोकवर्गणीतून लढवली नगरसेवक पदाची निवडणूक यवतमाळ जिल्ह्यातील नेर नगर परिषदेत जांभा ऊर्फ सचिन कैलास कराळे नावाच्या तरूणाने ऐतिहासिक विजयी मिळवलाय. जांभाच्या विजयाची जिल्ह्यात जोरदार चर्चा होतेय. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, खिशात पैसे नाहीत, स्वतःचे बँक खातेही नाही अशा परिस्थितीत जांभाने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि प्रस्थापित नेत्याला पराभूत करत विजय खेचून आणला. नेरमध्ये त्याची ओळख ‘ज्याचा कोणी नाही, त्याचा जांभा’ अशी आहे. जांभा हा निस्वार्थी सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. स्वतःचे हक्काचे घरही नाही. गेली अनेक वर्षे तो कधी रुग्णालयात, कधी मित्राच्या हॉटेलमध्ये मुक्काम करून राहतो. तरीही तो गरीब रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध असतो. दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक गरजू रुग्णाला तो आधार देतो. गरीबांचे प्रश्न सोडवणे, रुग्णसेवा करणे अशी त्याची जनसेवा नेरमध्ये सर्वपरिचित आहे. याच निस्वार्थ कामाची पोचपावती नेरच्या जनतेने निवडणुकीत त्याला दिलीय. ५) पुणे जिल्ह्यात अजित पवारांचाच वरचष्मा- नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यात मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीच दादागिरी पाहायला मिळाली आहे. अजित पवारांनी आपल्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा करिष्मा करत ताकद दाखवून दिलीय. 17 पैकी तब्बल 10 ठिकाणी अजित पवारांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून आलेत. पुणे जिल्ह्यात 14 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींचा निकाल जाहीर झाला असून या सर्व ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जोरदार प्रदर्शन पाहायला मिळालं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बारामती, इंदापूर, भोरसह एकूण 10 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदावर विजय मिळवत पुणे जिल्ह्यात आपणच मोठा भाऊ असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलंय. यावर अजित पवारांनी सुद्धा ‘पुणे जिल्हा कोणाच्या पाठीमागे आहे ते पहा’, अशी प्रतिक्रिया दिलीय. ६) देशातील लाचखोरी थेट संरक्षण मंत्रालयापर्यंत घुसली केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) शनिवारी संरक्षण मंत्रालयात तैनात असलेल्या लेफ्टनंट कर्नल अधिकाऱ्याला लाचखोरीच्या आरोपाखाली अटक केलीय. उत्पादन विभागात तैनात असलेले लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा यांच्यावर बेंगळुरू येथील एका कंपनीकडून 3 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. सीबीआयने शर्मा यांच्या घरातून 2.36 कोटी रुपये जप्त केलेत. सीबीआयने शर्मा यांच्या पत्नी कर्नल काजल बाली यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केलाय. झडतीदरम्यान काजल यांच्या घरातून 10 लाख रुपये जप्त करण्यात आलेत. काजल ही राजस्थानातील श्रीगंगानगर येथील डिव्हिजन ऑर्डनन्स युनिट (डीओयू) ची कमांडिंग ऑफिसर आहे. या प्रकरणात मध्यस्थ विनोद कुमारलाही अटक करण्यात आलीय. या घटनेने एकाच खळबळ उडालीय. ७) भारतीय रेल्वेकडून ६ महिन्यात दुसऱ्यांदा भाडेवाढ- भारतीय रेल्वेनं रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. याबाबतची घोषणा रेल्वे मंत्रालयाकडून आज करण्यात आलीय. नव्या दरांची अंमलबजावणी येत्या 26 डिसेंबरपासून करण्यात येणारय. रेल्वेचा खर्च आणि प्रवाशांवरील खर्चाचा भार याचं संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं भारतीय रेल्वेनं म्हटलंय. भारतीय रेल्वेनं उपनगरीय सेवा आणि मासिक सिझन तिकीटाच्या दरात वाढ केलेली नाही. याशिवाय ऑर्डिनरी क्लास म्हणजेच जनरल तिकीटावर प्रवास करणाऱ्यांसाठी 215 किमीपर्यंत कोणतेही दर वाढवण्यात आलेले नाहीत. जनरल तिकीटाचे दर 215 किमीपासून पुढील अंतरासाठी प्रति किलोमीटर 1 पैसा अशा प्रकारे वाढवण्यात आले आहेत. मेल आणि एक्सप्रेस नॉ एसीसाठी 2 पैसे प्रति किमीची वाढ करण्यात आली आहे. तर, वातानुकुलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति किमी 2 पैसे अधिक मोजावे लागतील. उपनगरीय रेल्वे आणि मासिक सिझन तिकीट म्हणजेच एमएसटीचे दर वाढवण्यात आलेले नाहीत. त्यामुळं मुंबईकरांना मात्र दिलासा कायम आहे. ८) इम्रान खान यांची पुन्हा देशव्यापी आंदोलनाची हाक- इम्रान खान यांनी आपल्या समर्थकांना पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलनाची हाक दिलीय. इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बिबी यांना तोशखाना २ प्रकरणी १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याच्या दुसरीच दिवशी हे आंदोलनाचे आवाहन करण्यात आलेय. अदियाळा तुरुंगात वकिलांशी बोलताना इम्रान खान यांनी आपल्या समर्थकांना देशव्यापी आंदोलनासाठी तयार राहण्याचे आवाहन केलंय. इम्रान खान यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबतचे निवेदन प्रसिद्ध करण्यात आलंय. मात्र इम्रान खान तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या अकाऊंटवरून हे निवेदन सोशल मीडियावर कोणी पोस्ट केले, हे समजू शकलेले नाही. खैबर पख्तुनख्वाच्या मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांना मी रस्त्यावरील आंदोलनासाठी तयार राहण्याचा संदेश पाठवलाय. सर्व देशाला आपल्या हक्कांसाठी उभे राहमे गरजेचे आहे. संघर्ष हीच आराधना आहे. पाकिस्तानींच्या स्वातंत्र्यासाठी मी हौतात्म्य देखील पत्करायला तयार आहे, असे इम्रान खान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. ९) अभिनेत्री नोरा फतेहीची अपघातानंतर प्रतिक्रिया- अभिनेत्री नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात झाला, ज्यात तिला किरकोळ दुखापत झाली. नोरा फतेही सनबर्न फेस्टिव्हलमध्ये डेव्हिड गुएटासोबत तिच्या नियोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होती. त्यावेळी तिच्या कार चालकानं एका दुसऱ्या वाहनाला धडक दिली. विशेष म्हणजे या अपघातानंतरही नोराने स्टेजवर परफॉर्म केलं. दुखापत झाल्यानंतर काही तासांतच तिने मुंबईतील डीजे डेव्हिड गुएटासोबत स्टेजवर हजेरी लावली होती. यानंतर आता तिने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत अपघाताबातची सविस्तर माहिती दिलीय. नोरा म्हणाली, मी सध्या ठीक आहे. दुपारी माझ्या कारचा गंभीर अपघात झाला होता. मद्यपान केलेल्या एका व्यक्तीची कार माझ्या गाडीला जोरात धडकली होती. ही धडक इतकी जोरदार होती की मी माझ्या गाडीच्या दरवाजावर आदळली गेली. माझं डोकं खिडकीवर जोरात आदळलं. पण मी जिवंत असून आता बरी आहे. १०) पाकिस्तानने अंडर-19 आशिया चषकावर कोरलं नाव एसीसी अंडर-19 आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा १९१ धावांनी धुव्वा उडवत विजेतेपद पटकावले. आयसीसी अकादमी मैदानावर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना समीर मिन्हासच्या १७२ धावांच्या विक्रमी खेळीच्या जोरावर ३४७ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल ३४८ धावांचा पाठलाग करणारा भारतीय संघ अवघ्या १५६ धावांत गारद झाला. कर्णधार आयुष म्हात्रे (२) आणि वैभव सूर्यवंशी (२६) अपयशी ठरले. दीपेश देवेंद्रनने सर्वाधिक ३६ धावा केल्या. पाकिस्तानच्या अली रझाने ३ बळी घेत भारताचा डाव २६.२ षटकांत संपवला. फलंदाजी आणि गोलंदाजीतील सुमार कामगिरीमुळे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.