अजित पवारांना घशाचे इन्फेक्शन, म्हणून….; ‘नॉट रिचेबल’वर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्टीकरण

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कल्याण आणि नाशिकमध्ये जाहीर सभा घेतली. तसेच मुंबईत त्यांचा रोडशोदेखील आयोजित करण्यात आला. मात्र नाशिक किंवा कल्याणची सभा असो किंवा मुंबईतील रोडशो असो, राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार हे कुठेही दिसून आले नाही. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या अनुपस्थितबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अजित पवार यांना घशाचे इन्फेक्शन झाले असून ते उद्यापासून पुन्हा प्रचारात दिसू लागतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
अजित पवार नॉटरिचेबल असले की ते नाराज आहेत, अशा बातम्या माध्यमांमध्ये दाखवल्या जातात. पण ते नॉटरिचेबलही नाही आणि नाराजही नाहीत. अजित पवार यांना निवडणुकीच्या कार्यकाळात घशाचे इन्फेक्शन झाले होते, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काळजी घ्यायला सांगितली आहे. मात्र ते उद्यापासून पुन्हा प्रचारात सहभागी होतील, अशी प्रतिक्रिया उमेश पाटील यांनी दिली.
अजित पवार यांना जाणीवपूर्वक प्रचारापासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. या आरोपालाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेसने केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहे. यात काहीही तथ्य नाही. अजित पवार यांचे कार्यकर्ते महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये, वॉर्डात, तालुका, जिल्ह्यात आहेत. मतदारांचा मोठा वर्ग त्यांच्या पाठिशी आहे. पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्याला प्रचारापासून बाजुला ठेवून कोण स्वतः चे नुकसान करुन घेईल का?, असे उमेश पाटील म्हणाले.





