अजित पवार गटाने बोगस कागदपत्रे सादर केली, शरद पवार गटाचा निवडणूक आयोगात दावा

नवी दिल्ली – अजित पवार गटाकडून दाखल करण्यात आलेली 20 हजार शपथपत्रके हे बोगस आहेत, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. यातील काही शपथपत्र ही अल्पवयीन मुलांच्या नावावर असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शरद पवार गटाकडून 30 ऑक्टोबरला निवडणूक आयोगात मोठ्या प्रमाणात पुरावे सादर केले आहेत. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा याची गुरूवारची सुनावणी संपली असून आता पुढील सुनावणी 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर अजित पवार गटाने दावा केल्यानंतर हा वाद निवडणूक आयोगात पोहोचला आहे. त्याची गुरूवारी सुनावणी पार पडली. शरद पवार गटाकडून युक्तिवाद करताना वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी अजित पवार गटाने 20 हजार बोगस कागदपत्रे सादर केली असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती पक्षाच्या घटनेला धरून नसल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाने केला होता. निवडणूक आयोगात अजित पवार गटाकडून नीरज कौल आणि मणिंदर सिंग हे बाजू मांडत आहेत. तर शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत बाजू मांडत आहेत. गेल्या सुनावणीमुळे अजित पवार गटाकडून पी.ए. संगमा, सादिक अली या दोन्ही केसचा दाखला देण्यात आला होता. यासोबतच शिवसेनेतील सत्ता संघर्षाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या निकालाचाही उल्लेख वारंवार केला होता.
राष्ट्रवादीतल्या चिन्हाच्या लढाईचा घटनाक्रम
– 2 जुलै रोजी अजित पवार गटाचा शपथविधी
– शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात 5 जुलै रोजी कॅव्हिएट दाखल
– अजित पवार गटाने 30 जून रोजी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवारांची निवड, 40 आमदार आपल्या बाजूने असल्याचाही दावा
– निवडणूक आयोगाने त्यावर दोन्ही बाजूंना नोटीसा देत 8 सप्टेंबरपर्यंत आपली बाजू मांडण्यास सांगितले





