अजित पवार गटातील नेत्याने जाहीर केली राजकीय निवृत्ती; पुतण्याची राजकीय वारसदार म्हणून केली घोषणा

Prakash Solanke | विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. तसेच आगामी निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आमदार प्रकाश सोळंके यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे मतदारांना संधी देण्याचे आवाहन केले होते.
राजकीय निवृत्तीसह आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय वारसदार म्हणून पुतण्या जयसिंह सोळंके यांच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत जयसिंह सोळंके निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. यानंतर आता माजी दिवंगत उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांच्या तिसऱ्या पिढीतील राजकीय वारसदार जाहीर झाले आहेत.
प्रकाश सोळंके यांची राजकीय कारकीर्द
प्रकाश सोळंके यांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरु झाली. पहिल्यांदा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर पराभूत झालेले प्रकाश सोळंके पुढच्या 1999 च्या विधानसभा निवडणुकीत माजलगाव मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाले. दोन टर्म भाजपकडून ते आमदार राहिले आहेत. त्यानंतर प्रकाश सोळंके 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार होते. या काळात त्यांनी साडेचार वर्षे महसूल, भूकंप पुनर्वसन आदी खात्यांचे राज्यमंत्री म्हणूनही काम केले. 2019 च्या निवडणुकीत ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाले.
जयसिंह सोळंके कोण आहेत?
माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचे लहान बंधू धैर्यशील सोळंके यांचे जयसिंह सोळंके हे चिरंजीव आहेत. जयसिंह सोळंके धारूर पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले आहेत आणि जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून काम केले आहे. त्यासोबतच बीड जिल्हा परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही जयसिंह सोळंके यांनी काम पाहिले आहे.
हेही वाचा:
“बांगलादेशला जाऊ नका…” ; हिंसाचारानंतर भारत सतर्क, नागरिकांसाठी सूचना जारी





