Ajit Pawar – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती शहर, तालुका, पुणे जिल्ह्यासह राज्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना राजकीय भवितव्याची चिंता दाटून आली आहे. एक हक्काचा माणूस, लढण्याचे बळ देणारा मोठा भाऊ, शासकीय निधींसाठी ओंजळ रिती करणारे दातृत्व, अशी अजित पवार यांची ओळख होती. ही उणीव पदाधिकाऱ्यांना सतावत आहे. १९९१ पासून राजकारणात प्रवेश केलेले अजित पवार यांनी विकास सोसायटीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. गावपातळीपासून राजकीय धडे गिरवत असताना त्यांनी त्यात अनेक सुक्ष्म निरीक्षणे करीत अभ्यासपूर्ण अनुभव घेतला. त्यामुळे अजित पवार यांना मास लीडर म्हणून ओळखले जाते. सहकार, कृषी, शहराची खडान्खडा माहिती असलेले अजित पवार यांनी जिल्ह्यातील अनेक तरूणांना राजकीय प्रवाहात आणले. त्यांची राजकीय कारकीर्द फुलवली. जिल्ह्यासह राज्यात अनेक पदाधिकाऱ्यांना साथ देऊन त्यांनी आमदार, मंत्री केले. आज त्याच जोरावर ते जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, महापालिका क्षेत्रासह विधानसभा मतदारसंघात नेतृत्व करीत आहेत. कधी निधींची गरज पडली की अजितदादा हे हक्काचे आहेत. ही भावना राष्ट्रवादीसह विरोधकांमध्ये होती. त्यामुळे अजित पवार यांच्याकडे निधींची मागणी केली की कधी रिकाम्या हाताने परत पाठवत नव्हते. अजितदादा पवार इतका अतूट विश्वासाचा बंध त्यांनी आपल्या राजकीय सहकाऱ्यांमध्ये निर्माण केला होता.राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्या पाठिशी आमदार, माजी आमदार, माजी नगरसेवक भक्कमपणे उभे राहून साथ दिली. लोकसभेच्या निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागला असताना पुन्हा जोमाने काम करीत अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळविले. सदैव कामांच्या गराड्यात राहून लोकहिताची कामे हातावेगळी करणारे अजित पवार यांची साथ आपल्याला मिळणार नाही, हीच भावना पदाधिकारी, नागरिकांमधून दाटून आली आहे. जिल्ह्यातील पदाधिकारी हताश नुकत्याच झालेल्या नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीत बारामती, जेजुरी, भोर, इंदापूर, दौंड, शिरूर नगरपरिषद, माळेगाव नगरपंचायतीत सत्ता काबीज केली आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांना भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले होते. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर नगरपरिषद हद्दीतील प्रस्तावित कामांसाठी नियोजन सुरू असताना हा आघात पदाधिकाऱ्यांना जिव्हारी लावणारा ठरला आहे.