Ajit Pawar – ‘मरणांती वैराणी’ अर्थात गेलेल्या व्यक्तीबरोबर त्याच्याशी असलेले वैरही संपते, असे म्हणतात. अगदी तसेच अजित पवार यांच्याविषयी सर्व जनतेचे झाले. पक्षीय राजकारण करताना अनेक जण दुखावले जातात किंवा पराभवही स्वीकारावा लागतो; परंतु अजितदादांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर पक्षीय अभिनिवेश सोडून प्रत्येकाने त्यांच्या स्टेट्समधून हळहळ व्यक्त केली आहे. केवळ राजकारणी, कार्यकर्तेच नव्हे, तर सर्वसामान्य लोकांनीही अनेक प्रकारे अजितदादांना श्रद्धांजली वाहिली. जे घडले ते अघटित होते, असे व्हायला नको होते, नि:शब्द झालो, असेच शब्द अनेकांच्या तोंडून निघाले आणि तेच त्यांच्या सोशल मीडियाच्या स्टेट्समधून दिवसभर प्रतीत होत होते. अपघात झाल्यानंतर प्रत्येकाच्या स्टेट्सवर शाॅकिंग, भयानक, सुन्न करणारी घटना, असे मेसेजेस पडत होते. दादांच्या हाताची घडी घातलेल्या फोटोखाली नि:शब्द, असे लिहून श्रद्धांजली वाहण्यात आली होती. याशिवाय दादांचे विविध छबी असलेले फोटो, यांचे पेंटिंग अशा अनेकानेक गोष्टींचा संचय या स्टेट्सवर नागरिकांनी टाकायला सुरुवात केली. दादांच्या स्वपक्षाचे कार्यकर्त्यांशिवाय अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही दादांबरोबरचे फोटो स्टेट्सला टाकले होते. यातील प्रत्येक जण पक्षीय अभिनिवेश सोडून दादांकडे कोणत्या ना कोणत्या कामासाठी, निवेदन देण्यासाठी, कौटुंबिक कार्यात, स्टेज शेअरिंग अशा अनेक ठिकाणी भेटलेला होता आणि त्यांच्याबरोबर त्यांनी फोटोही काढले होते, हे सगळे फोटो स्टेट्सवर पाहायला मिळत होते. अजितदादा पवार आज महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादागिरी’ संपली, फार घाई केलीत दादा, संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला, कामाचा माणूस अशा शब्दांमधून दादांच्या कार्याची महतीही अनेक जण उधृत करत होतेच; शिवाय दादांच्या भाषणाच्या रील्सही खूप वेगाने प्रसृत होत होत्या. जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना, तोपर्यंत तुमचे भलेच करेन…मी कामाचाच माणूस आहे, अशा भाषणांचे व्हिडिओ स्टेट्सला ठेवले जात होते. त्या भाषणांच्या रील्समधून दादांचा स्पष्टवक्तेपणाही दिसत होता. प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणारा माणूस, चुकीच्या वेळी गेला. आज नियतीच्या घड्याळाची वेळ चुकली, अशा डोळ्यांत पाणी आणणाऱ्या शब्दांनी अनेकांनी श्रद्धांजली वाहिली, तर कार्टूनमधूनही त्यांना श्रद्धांजली वाहिली जात होती. त्यामध्ये ‘कामाचा माणूस’ असे लिहिलेली; परंतु रिकामी खुर्ची, बोला यमराव, काय काम काढलं, असा यमालाही प्रश्न विचारणारे दादा असे व्यंगचित्र हे विशेषत्त्वाने सद्गदीत करणारे ठरले.