पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीला रंग चढत असून मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथी होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने शिंदेसेनेला धक्का देत उपशहर प्रमुखांनाच गळाला लावले आहे. शिवसेना पक्षाचे पिंपरी चिंचवड उपशहर प्रमुख राजेश आरसूळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. आरसूळ हे खासदार श्रीरंग बारणे यांच्या जवळचे असल्याचे बोलले जाते. पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्के देत अनेक प्रवेश करून घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवक भाजपात जात असताना अजित पवार यांनी सोमवारी (दि. २२) भाजपमधील एक आणि शिवसेनेतील एक असे दोन मोठे प्रवेश करून घेतले. शिवसेना शहर उपप्रमुख राजेश आरसूळ व त्यांच्या पत्नी मनीषा राजेश आरसूळ यांनी अजित पवार यांचे उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणूक प्रमुख नाना काटे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते. राजेश आरसूळ व मनीषा आरसूळ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशामुळे वाल्हेकर वाडी, चिंचवडेनगर प्रभाग क्रमांक १७ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पॅनल मजबूत झाले असून या प्रभागातील भाजपच्या दिग्गजांना मोठा धक्का बसणार असे चित्र निर्माण झाले आहे.