रामगिरी महाराजांना अटक करा, अमोल मिटकरींनी केली मागणी

अकोला : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक भूमिका घेत रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी?
अमोल मिटकरींनी महंत रामगिरी महाराज यांच्यावर टीका करताना वापरलेल्या शब्दावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रामगिरी महाराजांवर टीका करतांना आमदार मिटकरींनी कुत्र्याचा दाखला दिलाय. भगव्या रंगाचा कुत्रा असला तर तो संत होऊ शकत नाही, असं आमदार अमोल मिटकरी म्हणालेय. याबरोबरच रामगिरी महाराज यांचा उल्लेख त्यांनी लफंगा असा केलाय. रामगिरी महाराजांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी असे अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
काय म्हणाले रामगिरी महाराज?
रामगिरी महाराज म्हणाले भीष्माचार्य आणि धर्मराज याबाबतीत प्रवचन देत होतो. त्यात राजधर्म काय असतो. राजधर्माचे राजाने कसे पालन करावे? अन्याय सहन करू नये, असे उदाहरण देताना बोललो. हा मुद्दा मांडत असताना बांगलादेशचा विषय पुढे आला. हिंदुंवर अत्याचार होतात त्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हावे, अत्याचाराच्या घटना वाईट आहेत. या विरोधात संघटित झाले पाहिजे, मजबूत राहीले पाहिजे असे रामगिरी महाराज म्हणाले.





