पुण्यासाठी अजित पवार पुन्हा मैदानात…; महापालिका, पीएमआरडीएच्या प्रकल्पांचा घेतला आढावा

पुणे – उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर अजित पवार पुन्हा सक्रीय झाले असून पवार यांनी मंगळवारी महापालिका, जिल्हा प्रशासन व पीएमआरडीएच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच “पुण्यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत दिली जाईल,’ असे आश्वासन त्यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात ऑनलाइन प्रणालीद्वारे ही बैठक झाली. महापालिका आयुक्तांसह, जिल्हा प्रशासन तसेच पीएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पवार यांनी पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचाही आढावा घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या बैठकीत पवार यांनी महामेट्रो आणि पीएमआरडीए मेट्रोचा आढावा घेतला. विशेषत: पुणे मेट्रोची उर्वरीत कामे वेळेत करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
तसेच, विस्तारीत मार्गांबाबत राज्यशासनाकडून लवकरात लवकर आश्वासन पवार यांनी यावेळी दिले. पीएमआरडीएचा शिवाजीनगर ते हडपसर हा विस्तारीत मेट्रो मार्ग करण्यासाठी महामेट्रो तसेच पीएमआरडीए दोन्ही यंत्रणा तयार आहेत. याचे काम कोणी करायचे यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र, त्यावर तोडगा निघत नसल्याने याबाबत लवकरच स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचे प्रशासनास सांगण्यात आले. याशिवाय, पुणे विद्यापीठ चौक, चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेत पुणे- नाशिक रेल्वेच्या भूसंपादनासह, रिंगरोड प्रकल्पाच्या कामांचाही आढावा पवारांनी घेतला.





