Ajit Pawar – “राजकारणातील एक झंझावात शांत झाला…” अशा शब्दांत राजगड तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि कार्यक्षम उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली. कोंढवळे येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘सर्वपक्षीय शोकसभे’त दादांच्या आठवणींनी अनेकांना अश्रू अनावर झाले.अजित पवार यांच्या आयुष्यात ‘शिस्त’ आणि ‘वेळेचे बंधन’ या गोष्टींना सर्वोच्च स्थान होते. याच शिस्तीचा प्रत्यय आजच्या शोकसभेतही आला. कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत गांभीर्याने आणि आदरपूर्वक राष्ट्रगीताने करण्यात आली. संपूर्ण सभागृहात राष्ट्रगीताचा सूर घुमत असताना, आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा सलाम करण्यासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात देशप्रेम आणि दादांविषयीची निष्ठा दाटून आली होती.तसेच, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व इच्छुक उमेदवारांनी देखील आपली पक्षीय ध्येयधोरणे बाजूला ठेवून, अजित पवार एक आदर्श लोकनेता म्हणून दादांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होणे पसंत केले.केवळ नेतेच नव्हे, तर राजगड तालुक्यातील कानाकोपऱ्यातून आलेले असंख्य नागरिक, महिला आणि युवक आपल्या ‘दादां’ना श्रद्धांजली वाहण्यासाठी भर उन्हात धावून आले होते. “प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोहोचणारा लोकनेता आज चुकीच्या वेळी निघून गेला,” ही भावना बॅनरवरच नव्हे, तर उपस्थित असलेल्या प्रत्येक सामान्य नागरिकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. यावेळी झालेल्या भाषणांमध्ये वक्त्यांनी सांगितले की, अजित पवार यांनी राजगड तालुक्याच्या विकासासाठी नेहमीच झुकते माप दिले. त्यांच्या कामाचा झपाटा आणि पहाटे ७ वाजता कामाला लागण्याची वृत्ती येणाऱ्या पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल. ही केवळ एक शोकसभा नसून, अजित पवार यांनी दिलेल्या विचारांचा आणि कामाचा वारसा पुढे नेण्याचा एक संकल्प ठरला. शोकसभेच्या शेवटी दोन मिनिटांचे मौन पाळून आणि पुष्पहार अर्पण करून या लोकनेत्याला अखेरचा निरोप देण्यात आला. पक्षापलीकडील ऐक्य अजित पवार यांचे कार्य केवळ एका पक्षापुरते मर्यादित नव्हते, हे आजच्या गर्दीवरून स्पष्ट झाले. या शोकसभेसाठी राजगड तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक प्रामुख्याने उपस्थित होते. राजकीय मतभेद बाजूला सारून अजित पवार यांच्या विकासात्मक दृष्टीकोनाचे कौतुक सर्वच स्तरांतून करण्यात आले.