Ajit Pawar – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि प्रशासकीय कामकाजावर मजबूत पकड असलेले खंबीर नेतृत्व अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्या जीवनाचे मुख्य ध्येय हे सर्वसामान्य जनतेचे हित हेच होते. त्यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकी आणि विलक्षण प्रशासकीय कौशल्याचे दर्शन नेहमीच घडले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र एका कर्तृत्ववान राजकारण्याला मुकला आहे, अशा शब्दांत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. सुरेश गोसावी यांनी भावना व्यक्त केल्या.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत विद्यापीठाचे पदाधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा दिला. राजकारण, सत्ताकारण आणि समाजकारण यांचा सखोल अभ्यास असलेला एक दूरदृष्टीचा नेता हरपल्याची भावना करण्यात आली. या वेळी कुलगुरू डाॅ. सुरेश गोसावी आणि प्र-कुलगुरू डाॅ. पराग काळकर यांच्यासह विविध मान्यवरांनी अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डाॅ. काळकर यांनीही त्यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाचा गौरव करत विनम्र श्रद्धांजली वाहिली.याप्रसंगी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, प्रा. संदीप पालवे, अधिसभा सदस्य शंतनू लामदाडे, गणपत नांगरे, वित्त व लेखाधिकारी डॉ. चारुशीला गायके, अधिष्ठाता डाॅ. विजय खरे, डाॅ. सुप्रिया पाटील, डॉ. संजय तांबट आदी उपस्थित होते.