Ajit Pawar – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने भोर तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे. भोर शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणीने कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या होत्या.अजितदादांच्या निधनाची वार्ता समजताच भोर तालुक्यातील सर्वपक्षीयांनी, सुरू असलेला निवडणूक प्रचार तत्काळ थांबवला. गुरुवारी (दि. २९) भोर नगरपरिषदेसमोर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, काँग्रेस आणि दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी दादांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला असून, त्यांच्या निधनामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार सर्वच पक्षांनी रद्द केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. अजित पवारांच्या निधन वृत्तानंतर भोर तालुक्यात सर्वसामान्य जनतेसह विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते भाऊक झाले. धडाडीने काम करणारा माणूस अचानक गेल्याने नागरिक ढसाढसा रडले. नगरपरिषदेच्या समोर श्रद्धांजली वाहताना नगराध्यक्ष रामचंद्र आवारे, उपनगराध्यक्ष ॲड. जयश्री शिंदे, तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे,कुणाल धुमाळ आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “महाराष्ट्राच्या राजकारणात कुशल नेतृत्व व संघटक म्हणून अजित पवार नाव होते. त्यांच्या निधनामुळे समाजातील चांगलं काम करणारे नेतृत्व हरपलं आहे. त्यांचा स्पष्टवक्तेपणा कायमच आमच्या स्मरणात राहील. त्यांनी शब्द दिल्यानंतर ते काहीही करून संबंधित काम करीत होते. प्रशासनावर त्यांची चांगली पकड होती. सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्न सोडवण्याकडे त्यांचा अधिक कल होता.” – संग्राम थोपटे, माजी आमदार, भोर विधानसभा “माझ्या वडिलांच्या निधनानंतर दादांनी मला २००६ साली राजकारणात आणले. माझ्या वडिलांची उणीव त्यांनी कधीही जाणवू दिली नाही. त्यांच्या मायेच्या सावलीत मला राजकारणातच नाही, तर माणूस म्हणूनही घडण्याची संधी मिळाली. मला मिळालेली पदे, प्रतिष्ठा, ओळख हे सगळं दादांच्या आशिर्वादाचं फळ आहे. आज दादांच्या जाण्याने माझे आयुष्य पोकळ झालं आहे. डोक्यावरचा हात गेला, आधार हरपला आणि मी पुन्हा एकदा पोरका झालो आहे.” – रणजीत शिवतरे, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे