दहिवडी – अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षासोबत पहाटेचा शपथविधी केला होता, तेव्हा मी ठरवले होते की, याला पुन्हा संधी द्यायची नाही. परंतु, आमच्यातीलच काही नेत्यांनी सांगितले की, पुन्हा एकदा संधी देऊन बघूया. त्यामुळे पुन्हा संधी दिली आणि उपमुख्यमंत्रिपदी बसवले. इतक्या मोठ्या पदावर बसूनही विश्वासघात केला आणि भाजपबरोबर जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली. पक्षामध्ये मोठी फूटही पाडली. परंतु, आता काहीही झाले तरी अजित पवारला पक्षामध्ये पुन्हा संधी नाही. संधी एकदाच द्यायची असते, पुन्हा पुन्हा नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता संवाद मेळावा शुक्रवारी दहिवडी (ता. माण) येथे झाला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, सुप्रिया सुळे असे म्हणाल्या होत्या की, अजित पवार आमचे नेते आहेत. त्यांच्या वक्तव्याबाबत आज सकाळी बारामतीमध्ये पत्रकारांनी तुम्हाला प्रश्न विचारला असता, तुम्ही म्हणाला की, अजित पवार आमचे नेते आहेतच, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता मात्र शरद पवार गडबडले आणि म्हणाले की, “मी असे म्हणालोच नाही. सुप्रिया तसे बोलली आहे. सुप्रिया आणि अजित यांचे बहीण- भावाचे नाते घट्ट आहे. त्यामुळे ती असे बोलू शकते,’ असे उत्तर देऊन शरद पवार यांनी घूमजाव केले.