अजितदादांची सातारा जिल्ह्याला आरोग्यपूर्ण भेट

सातारा – उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्याला महत्वपूर्ण योजनांची भेट दिली आहे. यामध्ये 100 खाटांच्या महिला रुग्णालयाच्या आस्थापनेला मंजुरी, पन्नास खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर, सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूल व नायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांना प्रत्येकी एक कोटी रुपये आणि कोयना परिसरात जलपर्यटन अशा विविध महत्त्वाकांक्षी योजनांची त्यांनी घोषणा केली.
सातारा जिल्हा आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे गेल्या 22 वर्षांपासून अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अजितदादांनी साताऱ्याच्या विकासासाठी कुठेही निधीची कमतरता पडू दिली नाही. कास धरण उंचीच्या प्रस्तावाचा विषय असो किंवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचा प्रश्न असतो अजितदादांनी कधीही निधीच्या बाबतीत हात आखडता घेतलेला नाही. शुक्रवारी विधानसभेत अजितदादांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडला.
पंचसूत्रीवर आधारित या अर्थसंकल्पामध्ये दादांनी राज्यातील आरोग्य सेवेसाठी 11 हजार कोटी रुपयांची तरतूद केली. यामध्ये सातारा जिल्ह्याच्या वाट्याला शंभर खाटांचे महिला रुग्णालय उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. तशी ही घोषणा यापूर्वीच झाली होती आणि त्याचे कामही सध्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सुरू आहे. येथील वूमन्स हॉस्पिटलची इमारत मेडिकल कॉलेजचा भाग म्हणून दाखवण्यात आली आहे. या वुमन हॉस्पिटलच्या आस्थापनेला अधिकृतरीत्या मंजुरी देण्यात आली असून या कामांना आता गती मिळणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याची आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत झाली आहे. याशिवाय 50 खाटांच्या ट्रामा केअर सेंटरची घोषणा अजित पवार यांनी केली असून मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण होणार आहे. याशिवाय “अमृतमहोत्सव स्वातंत्र्याचा’ या कार्यक्रमाअंतर्गत महापुरुषांच्या गावातील शाळांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची तरतूद अजितदादा पवार यांनी केली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव (ता. खंडाळा) येथील प्राथमिक शाळा तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रवेश घेतलेली सातारा शहरातील राजवाडा परिसरातील प्रतापसिंह हायस्कूल या दोन शाळांचा समावेश आहे. या निधीच्या उपलब्धतेमुळे या दोन्ही शाळांचे भौतिक सुविधांसह रुपडे पालटणार आहे.
कोयनेला जलपर्यटन विकसित करणार
अजितदादा पवार यांनी छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याचे प्रतीक सांगणाऱ्या किल्ल्यांसाठीसुद्धा भरीव निधीची तरतूद घोषित केली आहे. यामध्ये किल्ले रायगड व परिसरासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद आहे. त्याच धर्तीवर स्वराज्याची राजधानी असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्यासाठी तरतूद करावी अशी सातारकरांची अपेक्षा होती. मात्र, ती यंदा पूर्ण होऊ शकलेली नाही. याशिवाय कोयना येथे जलपर्यटन विकसित करण्याचीसुद्धा घोषणा अजितदादांनी केली आहे. या जलपर्यटनासाठी विस्तृत आराखडा करून त्याकरिता निधी उपलब्ध करण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

