पुणे जिल्हा | गारटकर यांना राज्यपाल नियुक्त उमेदवारी मिळण्यासाठी अजितदादांना साकडे

इंदापूर, (प्रतिनिधी)- राज्यपाल नियुक्त विधान परिषदेची उमेदवारी प्रदीप गारटकर यांना मिळण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकार्यांनी निवेदनाद्वारे सोमवारी (5 ऑगस्ट) मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, सहकार, कला-क्रीडा क्षेत्र व विशेषतः दिव्यांग क्षेत्रात भरीव योगदान आहे.
त्यांचे संघटन कौशल्य राज्यभर परिचित आहे. सन 1982 पासून पतित पावन संघटना – भारतीय जनता पार्टी – शिवसेना आणि सन 2006 नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तब्बल 42 वर्षे सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत.
त्यांचे राजकीय जीवन संघर्षमय आहे. गेली 18 वर्षे आपले नेतृत्व स्वीकारून अत्यंत प्रभावीपणे पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम करीत आहेत. त्यांनी गोरगरीब, उपेक्षित घटकांसाठी अनेक वर्षे संघर्ष केला असल्यामुळे उभा महाराष्ट्र प्रदीप गारटकर यांना ओळखतो.
राजकारणाबरोबरच अनेक क्षेत्रात काम करीत असतांना, सद् गुरू वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांचा वावर आहे. वारकरी संप्रदाय आणि इतरही अनेक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणार्या अनेक संस्थाशी त्यांची जवळीक आहे.
त्याचप्रमाणे समर्थ व्यायाम मंडळ संचलित मुकबधीर, मतीमंद, अपंग शाळेची उभारणी करून ही शाळा गेली 30 वर्षे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे.
सन 1987 पासून 550 गोरगरीब अल्पभूधारक शेतकर्यांना एकत्रित करून सहकारी तत्वावरील 1500 हेक्टर्स क्षेत्रात श्रीनाथ पाणीपुरवठा सहकारी संस्थेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. त्या सहकारी संस्थेचे ते अध्यक्ष आहेत.
इंदापूरचे नगराध्यक्ष असताना गारटकर यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. ते महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून देखील कार्यरत होते. पुणे शहरातील नामांकित विद्या सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविलेले आहेत.
समाजातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना योग्य व अचूक मार्गदर्शन ते नेहमी करीत असतात. उत्तम वर्तृत्व शैली, मराठी-हिंदी-इंग्रजी भाषांवर त्यांचे प्रभूत्व, संवेदनशील, कष्टाची तयारी असलेलं कार्यक्षम व चारित्र्यवान व्यक्तीमत्व म्हणून ते महाराष्ट्राला प्रदीप गारटकर परिचित आहेत.
त्यांना राज्यपालनियुक्त विधानपरिषदेची संधी आपल्या पक्षाने दिल्यास त्यांच्यावर विविध क्षेत्रातील प्रेम करणारे असंख्य चाहते खुश होतीलच, पण त्यांचे विरोधक देखील खुष होतील आणि संघटनेचे बळ निश्चित वाढेल अशी आम्हाला खात्री वाटते.
स्वतःचे गुडवील असलेला कार्यकर्ता गारटकरच
पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहेच, पण मागील विधानसभा निवडणूकीच्या वेळी ग्रामीण भागातून सात आमदार व एकाचे दोन खासदार करण्यासाठी प्रदीप गारटकर यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
पक्ष दुभंगल्यानंतर आपल्याबरोबर आलेल्या जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये गारटकर यांच्याइतका सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात अनुभव असलेला व स्वतःचे गुडवील असलेला कार्यकर्ता आपल्या पाठीशी असणे हे समाजामध्ये निश्चित भूषणावह असणार आहे.





