रांची : झारखंड कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जेएससीएचे अध्यक्ष अजयनाथ शाहदेव यांच्या विरुद्ध ईडीने बुधवारी समन्स बजावले असून ११ नोव्हेंबर रोजी रांची येथील ईडीच्या प्रादेशिक कार्यलयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. रांचीतील जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या बांधकामादरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनूसार, जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या बांधकामातील अनियमिततेसंदर्भात जमदेशपूर न्यायालयात आधीच खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण ईडीने आपल्या ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण स्टेडियमच्या बांधकामात महत्त्वाची भूमिका बजावणारे जेएससीए अध्यक्ष अमिताभ चौधरी यांच्या कारकिर्दीतील असल्याचे बोलले जात आहे. याचवर्षी झालेल्या जेएससीएच्या निवडणुकीमध्ये अजयनाथ शाहदेव यांच्या पॅनलने, प्रतिस्पर्धी एस. के. बोहरा यांचा पराभव केला होता. शाहदेव यांच्या पॅनलमध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू सौरभ तिवारी व शाहबाज नदीम यांचा देखील समावेश होता. शाहदेव यांनी कॉंग्रेसच्या तिकिटावर हटिया विधानसभा मतदारसंघातून अनेक वेळा निवडणूक लढवली आहे. गतवेळी मात्र त्यांना भाजपच्या नवीन जयस्वाल यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.