माझ्यावर हल्ला झाल्याचे माझ्याकडे पुरावे : घोष

हल्लेखोर असल्याचे पुरावे द्या : पोलिसांना खुले आव्हान
नवी दिल्ली : माझ्यावर हल्ला झाल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषा घोष हिने सांगितले. पोलिसांनी हल्लेखोरांमध्ये तिचा समावेश असल्याचे जाहीर केल्यानंतर काही क्षणातच तिने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू माध्यमांसमोर मांडली.
जवाहलाल नेहरू विद्यापीठाच्या आवारात पाच जानेवारी रोजी बुरखेधारी गुंडांच्या टोळीने विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला होता. त्यात घोष यांना निर्घृणपणे मारहाण करण्यात आली होती. त्यांच्या रक्तबंबाळ चेहऱ्याचे छायाचित्र या हल्ल्याची भीषणता स्पष्ट करणारे होते.
दिल्ली पोलिसांना त्यांचा तपास करू द्या. माझ्याकडे माझ्यावर हल्ला कसा झाला त्याचे पुरावे आहेत, असे घोष यांनी आव्हान दिले. कोणत्याही हल्ल्यात सहभाग असल्याचे नकारत त्यांनी पोलिसांच्या कारवाईपुढे प्रश्नचिन्ह उभे केले. माझ्या सहभागाचा पुरावा दिल्ली पोलिसांनी द्यावा. मी हिंसाचारात सहभागी झाल्याचा कोणताही व्हिडिओ असूच शकत नाही, असे त्या म्हणाल्या.
तपास निष्पक्ष होईल अशी आशा व्यक्त करून त्या म्हणाल्या या देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मला न्याय मिळेल. पण दिल्ली पोलिसांच्या पक्षपातीपणाचे काय? असे त्यांनी विचारले. माझी फिर्याद एफआयआर म्हणून नोंदवून घेतली नाही. मी कोणताही हल्ला घडवून आणला नाही, असे त्या म्हणाल्या.
पोलिसांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या नऊ जणांच्या यादीत अभाविपचे दोन तर डाव्या विद्यार्थी संघटनांच्या सात जणांची नावे आहेत. आपण घटनास्थाळावर होत्या याकडे घोष यांचे लक्ष वेधले असता, त्या म्हणाल्या विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष म्हणून मी तिथे गेले होते. मला सहकारी विद्यार्थ्यांनी तेथे हिंसाचार सुरू आहे, असे कळवल्यानंतर तिथे जाणे हे माझे कर्तव्य होते. याविरोधातील आंदोलन विद्यार्थी शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने पुढे नेतील, असेही घोष म्हणाल्या.




