बँकॉक – म्यानमारच्या लष्कराने गेल्या आठवड्यात सागाइंग प्रांतात एक हवाई हल्ला केला. त्यामध्ये किमान १८ सामान्य नागरिक ठार झाले आणि अन्य २० जखमी झाले आहेत. या प्रांतातल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीवर हा हवाई हल्ला झाला. हा हल्ला ५ डिसेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास मायाकान गावात झाला. हे गाव देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या मंडाले शहराच्या वायव्येला १२० किलोमीटर अंतरावर आहे. एक ५ वर्षांचा शाळकरी मुलगा आणि एक शिक्षकही या हवाई हल्ल्यात मरण पावले. डझनभर गावकरी टिव्हीवर म्यानमार विरुद्ध फिलिपीन्समधील फुटबॉलचा सामना बघत थांबले होते. तेंव्हाच या टपरीवर हा हवाई हल्ला झाला असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. चहाच्या टपरीवरच्या गर्दीमध्ये राजकीय गप्पा होत असतात. म्हणून हा हल्ला केला गेल्याचे बोलले जाते आहे. देशातील लोकशाहीवादी गटांना लक्ष्य करण्यासाठी झालेला आणि सामान्य नागरिक ठार झालेला हा सर्वात अलिकडचा हवाई हल्ला होता. म्यानमारमध्ये या महिन्याच्या अखेरीस सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तरी लष्कराने असे हल्ले सुरू ठेवले आहेत. मात्र या हल्ल्यासंदर्भात म्यानमारच्या लष्करी प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या अंत्यसंस्कारांनंतर गावातील अनेक कुटुंबांनी गावातून पलायन केले आहे. तर उरलेल्यांनी बॉम्बहल्ल्यापासून वाचण्यासाठी भूमिगत बंकर खणायला सुरुवात केली आहे.