Thailand-Cambodian border – थायलंडने सोमवारी कंबोडियाच्या सीमाभागात पुन्हा हवाई हल्ले केले आहेत पण दोन्ही देशांनी एकमेकांवर पहिल्यांदा हल्ले केल्याचा आरोप करत आहेत. थायलंड आणि कंबोडियामध्ये ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने शस्त्रसंधी करार करण्यात आला. पण तरीही दोन्ही देशांमध्ये एकमेकांबद्दलचा असंतोष खदखदत राहिला आहे. ही शस्त्रसंधी होण्यापुर्वी जुलै महिन्यात दोन्ही देशांमध्ये पाच दिवस जोरदार संघर्ष झाला होता. या संघर्षात दोन्ही बाजूंकडील डझनभर सैनिक आणि सामान्य नागरिक ठार झाले होते. कंबोडियाच्या सैनिकांनीच प्रथम थायलंडच्या हद्दीत वेगवेगळ्या भागात गोळीबाराला सुरुवात केली, असा दावा थायलंडच्या सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल विन्थाई सुवारी यांनी केला. या गोळीबारामध्ये थायलंडचा एक सैनिक ठार झाला आणि अन्य चौघे जखमी झाले. गोळीबारामुळे नागरी वस्तीतील रहिवाशांना तेथून दूर हटवावे लागले. त्यानंतर थायलंडच्या विमानांनी कंबोडियाच्या लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. कंबोडियाच्या गोळीबाराला जेथून मदत केली जात होती, अशा ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, असेही या प्रवक्त्याने सांगितले. थायलंडच्या लष्करी विमानांनी पहिल्यांदा कंबोडियाच्या लष्करी ठिकाणांवर मारा केला. मात्र कंबोडियाने सोमवारी झालेल्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले नाही, असे कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्या माली सोचेआता यांनी सांगितले. कंबोडियाबरोबर शत्रुत्व वाढवण्याच्या आणि शांतता आणि स्थिरता धोक्यात येऊ शकले, अशा सर्व कारवाया ताबडतोब थांबवाव्यात, असे आवाहन कंबोडियाने थायलंडला केले आहे. कंबोडियाच्या भूसुरुंगाच्या स्फोटात थायलंडचे काही सैनिक जखमी झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्षाला सुरुवात झाली होती. दोन्ही देशांमधील संघर्ष वाढण्यापुर्वीच गेल्या महिन्यात अमेरिकेने मध्यस्थी करून युद्धबंदी घडवून आणली होती.