नवी दिल्ली : एअरबसने त्यांच्या सर्व A320 विमानांवर तत्काळ परिणाम करणारे निर्देश जारी केल्यानंतर जगभरातील विमान कंपन्यांनी A320 च्या फ्लाइट रद्द केल्या तसेच काहींनी उड्डाणे उशिरा होणार असल्याचा इशारा दिला आहे. एअरबसच्या A320 विमानांच्या फ्लाइट कन्ट्रोल सिस्टीममध्ये बिघाड झाला असून त्यासाठी सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर अपडेटची गरज आहे. मात्र, याचा फटका जगभरातील 6 हजार तर भारतात 250 उड्डाणांना बसल्याची माहिती मिळत आहे. सॉफ्टवेअर अपडेट होण्यासाठी 2 ते 3 दिवसांचा अवधी लागतो, असे कळते. एअरबसच्या लक्षात आले की, विमान सर्वाधिक उंचीवर असताना सूर्याच्या तीव्र किरणोत्सर्गामुळे विमानाचा डेटा खराब होऊ शकतो. तीव्र सौर किरणोत्सर्गामुळे विमानातील उड्डाण नियंत्रण संगणकांमध्ये (फ्लाइट कन्ट्रोल सिस्टीम) व्यत्यय येऊ शकतो. हे आढळून आल्यानंतर हजारो एअरबस विमानांना सॉफ्टवेअर अपडेटसाठी ग्राउंड (उतरावे) करावे लागले. तीव्र सौर किरणोत्सर्गाशी संबंधित उड्डाण-नियंत्रण समस्येमुळे एअरबसच्या जागतिक ताफ्यातील सुमारे अर्ध्या विमानांना सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर अपडेटची आवश्यकता आहे. बहुतेक विमानांना एक साधे सॉफ्टवेअर अपडेट करावे लागते. परंतु ब्रिटन आणि इतर देशांमधील नियामकांनी दुरुस्तीनंतरही उड्डाणांमध्ये अडथळे येऊ शकतात, असे सांगितले आहे. अमेरिकन एअरलाइन्स, डेल्टा, एअर इंडिया, विझ एअर आणि एअर न्यूझीलंडसह वाहकांनी आधीच उड्डाणे उशिरा किंवा विलंबाने होणार असल्याचे जाहीर केले आहे. जागतिक विमान वाहतूक नियामकांनी एअरबस A320 विमानांसाठी तत्काळ सॉफ्टवेअर अपडेटचे आदेश दिल्यानंतर या आठवड्याच्या शेवटी भारत आणि अनेक देशांमधील हवाई प्रवासात अडथळे निर्माण होऊ शकतात. सौर किरणोत्सर्गामुळे फ्लाइट कन्ट्रोल सिस्टीमच्या प्रमालीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, याची भीती व्यक्त केली जात आहे. सुरक्षितता, पर्यटन आणि व्यावसायिक प्रवासासाठी जोखीम असल्याचे सांगून विमान वाहतूक तज्ज्ञांनी या परिस्थितीला मोठे हवाई संकट म्हटले आहे. ही समस्या भारतासह जगभरात आहे. जगातील 6 हजारांहून अधिक एअरबस A320 विमानांना याची झळ पोहचली आहे. A320 च्या नवीन मॉडेलला सॉफ्टवेअर अपडेट्ससाठी 2-3 तास लागतात तर जुन्या विमानांना एक ते दोन दिवस लागू शकतात. त्यामुळे विमान कंपन्यांना याची मोठी आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.