राजधानीतील वायू प्रदूषण येणार नियंत्रणात; दिल्ली सरकारला मिळणार 18 कोटींचा निधी

नवी दिल्ली – देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील वायूच्या प्रदूषणाची पातळी दरवर्षी उच्चांक गाठते. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राष्ट्रीय प्रदूषण व्यवस्थापनातील मोठी दरी भरून काढण्यासाठी नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम अर्थात एनसीएपीअंतर्गत दिल्लीला कोटींचा निधी मिळणार आहे. यामुळे वायू प्रदुषण नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळणार आहे.
दिल्लीला एनसीएपी अंतर्गत निधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. एनसीएपी अंतर्गत दिल्लीला 18.74 कोटी मिळतील. 2019 मध्ये सुरू झाल्यापासून यंदा प्रथमच या कार्यक्रमाअंतर्गत दिल्लीला हा निधी प्राप्त होणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
राजधानी दिल्लीला दोन वर्षांपासून एनसीएपीअंतर्गत निधी मिळालेला नाही. कारण, शहराकडे इतर संसाधने उपलब्ध आहेत. उदा. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात जमा होणारा 2 हजार सीसीवरील डिझेल वाहनांवर लावलेला ग्रीन सेस, त्याचसोबत दिल्लीत प्रवेश करणाऱ्या व्यावसायिक वाहनांवर लावला जाणारा प्रदूषण कर, असे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, यावेळी एनसीएपीअंतर्गत निधी उपलब्धतेत सुधारणा केली गेली आहे.
वित्त आयोगाकडून प्रदूषण व्यवस्थापनासाठी 50 शहरांना आधीच चांगली रक्कम (2020-21 मध्ये 4,400 कोटी रुपये आणि 2021-22 मध्ये 2,217 कोटी) मिळत आहे. त्याचसोबत, एनसीएपी अंतर्गत उर्वरित 82 शहरांसाठी देखील निधीची उपलब्धता सुधारली गेली आहे. त्यामुळे, आम्ही दिल्लीलाही काही निधी देण्याचे ठरवले, असे अधिकारी म्हणाले. दरम्यान, या 82 शहरांसाठी या वर्षी एकूण 290 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.





