Air pollution : वायू प्रदूषणामुळे 1980 ते 2020 या काळात जगभरात सुमारे 135 दशलक्ष लोकांचा अकाली मृत्यू झाला आहे. सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात ही धक्कादायक समोर आली आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष जर्नल एन्व्हायर्नमेंट इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित झाले आहेत. पीएम (particulate matter) 2.5 प्रदूषणाचा मृत्यूदरावर कसा परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी संशोधकांनी पृथ्वीच्या वातावरणातील सूक्ष्म कणांच्या पातळीसंदर्भातील नासा उपग्रहाच्या डेटाचाही अभ्यास केला. पीएम 2.5 प्रदूषण पातळी वाढवण्यात एल निनो-सदर्न ऑसिलेशन, इंडियन ओशन डीपोल आणि नॉर्थ अटलांटिक ऑसिलेशन यासारख्या हवामानातील परिवर्तनशील बाबींवरही संशोधनात प्रकाश टाकण्यात आला आहे. या हवामान बदलाच्या घटनांमुळे प्रदूषणाच्या सूक्ष्म कणांचा, पीएम 2.5, गंभीर परिणाम झाला आणि अकाली मृत्यूंमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली, असे मत संशोधकांनी नोंदवले आहे. आधीच्या अभ्यासांमध्ये हवेची गुणवत्ता आणि हवामानाशी संबंधित इतर बाबींची माहिती घेण्यात आली. ही पाहाणी जगभरात घेण्यात आली होती. विशिष्ट जलवायूचे पॅटर्न विविध क्षेत्रांमध्ये वायूप्रदूषणावर कसा परिणाम करतात, हे तपासण्यासाठी 40 वर्षांपेक्षा जास्त डेटाचे विश्लेषण करण्यात आले. जलवायू पॅटर्नमधील बदलांमुळे वायूप्रदूषण आणखी वाईट होऊ शकते, असे या अभ्यासाचे निष्कर्षातून दिसते. आशियात सर्वाधिक परिणाम या अभ्यासातून वायूप्रदूषणाचा जास्त प्रभाव आशियामध्ये असल्याचे दिसले. चीनमध्ये 4.9 कोटी तर भारतात 2.61 कोटी मृत्यू झाले आहेत. पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया आणि जपानमध्येही पीएम 2.5मुळे अकाली मृत्यूचे प्रमाण जास्त आहे, हे प्रमाण वर्षाला 20 ते 50 लाखांच्या दरम्यान आहे. सन 1980 ते 2020 यादरम्यान झालेल्या अकाली मृत्यूपैकी एक तृतीयांश अकाली मृत्यू स्ट्रोकशी (33.3 टक्के) संबंधित आणि जवळपास तेवढेच मृत्यू इस्केमिक हृदयरोगशी (32.7 टक्के) संबंधित होते. उर्वरित अकाली मृत्यू क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, लोअर रेस्पीरेटरी इन्फेक्शन आणि फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे झाले आहेत.