शिर्डी – दिल्लीहून शिर्डीला येणाऱ्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने एअर होस्टेसचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाईट क्रमांक 6E 6403 मध्ये घडली. विमान शिर्डीत उतरल्यानंतर एअरलाइन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राहाता पोलिसांनी आरोपी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रवाशी लष्करी जवान असल्याचे पोलिस तपासात समोर आले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित एअर होस्टेस मूळची केरळमधील कोचीन येथील आहे. शुक्रवारी, २ मे रोजी दुपारी १ वाजून ४० मिनिटे ते ४ वाजून १० मिनिटांच्या दरम्यान दिल्ली ते शिर्डी या विमानाच्या प्रवासादरम्यान ही घटना घडली. आरोपी प्रवासी संदीप सुमेर सिंग याने एअर होस्टेसच्या कपड्यांवरून दोन वेळा स्पर्श करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर शिर्डी विमानतळ इंटरग्लोब एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड इंडिगो कंपनीचे कर्मचारी संतोष कोंडीबा चौरे (रा. लोणी) यांनी राहाता पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार, पीडित एअर होस्टेसने याबाबत लेखी तक्रार दिली असून, आरोपी संदीप सुमेर सिंग (रा. गालड, चुरू, राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एन. यू. पेटारे करत आहेत.