नवी दिल्ली – येत्या 22 जुलैपासून हवाईदलाची कमांडर पातळीवरील उच्चस्तरीय बैठक होत असून त्यात पुर्व लडाखच्या स्थितीचा प्रामुख्याने आढावा घेतला जाणार आहे. हवाईदलासाठी राफेल विमाने याच महिन्यात भारतात दाखल होत असून ही विमाने लडाख भागात तैनात करण्यावरही यावेळी निर्णय अपेक्षित आहे.
हवाईदल प्रमुख एअर चिफ मार्शल बहादुरी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून त्यात हवाईदलाच्या सात प्रमुख कमांडच्या प्रमुखांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. पुर्व लडाख भागात हवाईदलाच्या तैनाती विषयी यात प्रामुख्याने चर्चा होईल. भारताने सीमा भागात मिराज 2000, सुखोई 30, मिग 29 ही लढाऊ विमाने तैनात केली आहेत.
ही विमाने दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळांमध्ये कारवाई साठी सक्षम आहेत. तशातच आता भारतात येणाऱ्या राफेल लढाऊ विमानांची तुकडीही सीमा भागातील फॉवर्ड पोस्टवर तैनात केली जाणार आहे त्यासंबंधातही यावेळी चर्चा अपेक्षित आहे.