#व्हिडीओ : ऐन पावसाळ्यात निर्जळी

संतप्त नागरिक रस्त्यावर : ठिकठिकाणी निदर्शने

पुणे –
पर्वती जलकेंद्राअंतर्गत होणारा पाणीपुरवठा 3 दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. त्याचा फटका सर्व पेठांसह, शिवाजीनगर, सहकारनगर तसेच नगररस्त्याच्या काही भागाला बसला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांसह विधानसभेच्या इच्छुकांनीही महापालिका प्रशासनासह भाजपला घेरले आहे. शनिवारी दिवसभरात शिवाजीनगर, कुंभारवाडा, सहकारनगर परिसरातील नागरिक थेट रस्त्यावर आले, तर शिवाजीनगर भागातील महिलांनी हंडामोर्चा काढत बालगंधर्व चौकात सुमारे दीड तास निदर्शने केली.

गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे शुक्रवारी व्यवस्थित पाणी मिळणे आवश्‍यक होते. मात्र, पाणीपुरवठा विभागाने त्याचे नियोजन न करता अनेक ठिकाणी बंदच्या दिवशी जलवाहिनी रिकामी केली. त्यामुळे शुक्रवारी पर्वती जलकेंद्रावर अवलंबून सर्व भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. त्याची खबरदारी प्रशासनाने घेणे आवश्‍यक होते. मात्र, शनिवारी सकाळीही तीच स्थिती राहिल्याने अनेक ठिकाणी नागरिकांच्या सहनशिलतेचा अंत झाला. सलग तीन दिवस पाणी न आल्याने शिवाजीनगर परिसरातील महिलांनी हंडा मोर्चा काढत बालगंधर्व चौकच अडविला.

माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांच्यासह या महिलांनी हे आंदोलन केले. तर दुसऱ्या बाजूला कुंभारवाडा परिसरातील नागरिकांनीही पाण्यासाठी आंदोलन केले. तर मध्यवर्ती पेठांमध्ये पुरवठा विस्कळीत झाल्याने महापौर मुक्ता टिळक आणि नगरसेवक हेमंत रासने यांनाही नागरिकांच्या नाराजीचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनीही पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत तातडीने पुरवठा सुरळीत करण्याची सूचना केली. दरम्यान, मुख्य रस्त्यावरच ही आंदोलने झाल्याने सकाळच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)