नवी दिल्ली : प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या तिसऱ्या वर्गातील मुलांना पुढील वर्षांपासून आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा विषय शिकविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. उच्च शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार यांनी सांगितले की, केंद्र सरकार आणि राज्य सरकारसह केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळांच्या अभ्यासक्रमात आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा (एआय) विषय सामील केला जाणार आहे. पुढील दोन वर्षांत तिसरीच्या अभ्यासक्रमात हा विषय सामील करायचा आहे. यासाठी युध्दपातळीवर तयारी करावी लागणार आहे. अभ्यासक्रम तयार करणे आणि त्यासाठी शिक्षकांना तयार करणे या गोष्टी लवकरात लवकर कराव्या लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने तिसऱ्या वर्गापासून आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा विषय शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. 2026-27 पासून हा विषय अभ्यासक्रमात सामील केला जाणार आहे. देशभरात एक कोटीपेक्षा जास्त शिक्षक आहेत. या शिक्षकांपर्यंत पोहचणे आणि एआय शिकविण्यासाठी त्यांना तयार करणे हे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागापुढचे सर्वात मोठे आव्हान आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ सध्या वर्गनिहाय एआयचा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम करीत आहे. आयआयटी मद्रासचे प्राध्यापक कार्तिक रमण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. शिक्षण मंत्रालयाने सध्याच्या शिक्षण व्यवस्थेला भविष्याभिमूख करण्याचे ठरविले आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी तयार करणे हा त्यामागचा हेतू आहे. सध्या सीबीएसईच्या शाळांमध्ये सहावी ते 12 व्या वर्गापर्यंत एआय आधारित विषय शिकविला जात आहे.