लॉस एंजल्स – कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्या आणि या क्षेत्रासाठी सेमीकंडक्टर तयार करणार्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात गेल्या एक वर्षात अभूतपूर्व वाढ झाली आहे. एन व्हिडिवा या कंपनीच्या शेअरचा भाव तर इतका वाढला आहे की या कंपनीचे बाजार मूल्य भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त म्हणजे पाच लाख कोटी डॉलर इतके झाले आहेत. या क्षेत्रावर गुंतवरूकदार आवश्यकतेपेक्षा जास्त विश्वास दाखवीत असल्याबद्दल आता या क्षेत्रातील जाणकार मंडळी सावध होण्याचा इशारा देत आहेत. त्यामध्ये गुगलची पालक कंपनी असलेल्या अल्फाबेट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांचा समावेश आहे. कृत्रीम बुद्धिमत्ता क्षेत्र भविष्याच्या दृष्टिकोनातून उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात गुगल कंपनीसह जगातील अनेक मोठ्या कंपन्या संशोधन आणि विकास करीत आहेत. याचा फायदा मिळावा म्हणून या कंपन्यांच्या शेअरची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र ती खरेदी मर्यादेपेक्षा जास्त होऊ नये असे त्यांनी सांगितले. अन्यथा जर अतिरिक्त गुंतवणुकीचा फुगा फुटला तर गुगलसह इतर कंपन्यावर याचा मोठा परिणाम होईल. एवढेच नाही तर बेफाम गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाया जाईल. असा प्रकार 1990 च्या दशकात डॉट कॉम बाबत झाला होता, याची आठवण पिचई यांनी करून दिली. अल्फाबेट कंपनीही या क्षेत्रात काम करीत असून या कंपनीच्या शेअरचा भावही यावर्षी 46 टक्क्यार्नी वाढला आहे. कंपन्यांच्या प्रमुखाबरोबरच अमेरिकेतील शेअर बाजार नियंत्रक आणि इतर नियंत्रण संस्थाही गुंतवणूकदारांना याबाबत सावध होण्याचा इशारा देत आहेत. स्वतः अल्फाबेट कंपनीही या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहे. या क्षेत्रात होणार्या अतिरिक्त गुंतवणुकीबाबत ओपन ए आय कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन, अॅमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेझॉस इत्यादींनीही सावध होण्याचा इशारा गुंतवणूकदारांना दिला आहे. एनव्हिडिया कंपनीचा चांगला ताळेबंद दरम्यान अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरच्या भावात गेल्या आठवड्यात फुगवट्याच्या कारणामुळे बरीच घट झाली होती. आता एनव्हिडिया कंपनीने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत कंपनीचा महसूल तब्बल 62 टक्क्यांनी वाढून 57.01 अब्ज डॉलर झाला असल्याची माहिती दिली. पुढील तिमाहित हा महसूल 65 अब्ज डॉलर होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पुन्हा अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांचे शेअर वाढले आहेत आणि जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.