पुणे – कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा विविध व्यावसायिक क्षेत्रांवर वाढता प्रभाव लक्षात घेता इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमात एआयचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे २०२७ पासून सीए पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी ‘एआय प्रशिक्षित’ असतील, अशी माहिती आयसीएआयचे अध्यक्ष चरणज्योत सिंग नंदा यांनी आज पुण्यात दिली. आयसीएआयतर्फे आयोजित एआय इनोव्हेशन समिट या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आयसीएआयचे उपाध्यक्ष प्रसन्न कुमार डी., सचिव डॉ. जयकुमार बत्रा, पुणे शाखा अध्यक्ष सचिन मिणियार, एआय समितीचे अध्यक्ष उमेश शर्मा, डब्ल्यूआयआरसीचे अध्यक्ष केतन सैय्यासह आदी उपस्थित होते. एआय ही केवळ एक स्पर्धा नसून ती एक संधी आहे. त्यामुळे एआयचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी आयसीएआयअंतर्गत स्वतंत्र एआय समिती स्थापन करण्यात आली असून, त्याद्वारे नोंदणीकृत सीएंना एआय प्रशिक्षण देण्यात आले आहे. आगामी काळात सनदी लेखापालांना केवळ पारंपरिक लेखापरीक्षण नव्हे, तर डेटा अॅनालिटिक्स, ऑटोमेशन आणि तंत्रज्ञानाधिष्ठित उपाययोजनांमध्येही निपुणता आवश्यक आहे. यासाठी आयसीएआयतर्फे हैदराबादसह देशभरात ९ संशोधन केंद्रे सुरू केली जात आहेत. पुण्यात एक विशेष केंद्राची निर्मिती होणार असून, त्यासाठी जागेचा शोध सुरू असल्याचेही नंदा यांनी सांगितले. आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर व प्रज्ञा मिश्रा यांचे एआयवर बीजभाषण झाले. नेहा फडके व प्रज्ञा बंब यांनी सूत्रसंचालन केले. सचिन मिणियार यांनी आभार मानले. शिष्यवृत्ती निधीत वाढ आयसीएआयने शिष्यवृत्ती निधीमध्ये मोठी वाढ करत ती रक्कम १०० कोटींहून ५०० कोटी रुपयांपर्यंत नेली आहे. ही शिष्यवृत्ती गुणवंत गरजू आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी आहे. शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी ही मोठी मदत ठरणार आहे, अशी माहिती चरणज्योत सिंग नंदा यांनी दिली.