AI in Sugarcane Farming – ऊस उत्पादन वाढीसाठी कृषि विज्ञान केंद्र, बारामती, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी व संत तुकाराम कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुध्दिमतेचा (एआय) वापर करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत कारखाना कार्यक्षेत्रात दोन स्वयंचलित हवामान केंद्र व २१ शेतकरी सहभागी झाले असल्याची माहिती संत तुकाराम साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांनी दिली. या योजनेअंतर्गत उपग्रह आधारीत मॅपिंग करुन मृदा, आद्रता, सॅन्सर बसविणेत आलेले आहेत व अॅपव्दारे हवामान, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोग व किड पूर्व सूचना याबाबतच्या शिफारशी शेतक-यांना मिळत आहेत. त्याचा शेतकऱ्यांना सकारात्मक फायदा होत आहे. यामध्ये २५ ते ३०टक्के अतिरिक्त पाण्याच्या वापरात, ३० ते ४०टक्के आवश्यकतेप्रमाणे किटकनाशके व बुरशीनाशकांची बचत होत असून किमान ३५ ते ४० टक्के ऊस उत्पादनात यामुळे वाढ होईल अशी माहिती कार्यकारी संचालक एस.जी. पठारे यांनी दिली. श्री संत तुकाराम सह. साखर कारखान्यामार्फत सन २०२५-२६ लागवड हंगामासाठी ऊस उत्पादनात सुधारणा होणेसाठी उभ्या ऊस पिकावर ड्रोनव्दारे फवारणी करणेसाठी एजन्सीजची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये व्हि.एस.आय. मांजरी निर्मित वसंत उर्जा, मल्टीमायक्रोन्युट्रंट, व वाढीच्या अवस्थेप्रमाणे मुख्य अन्नद्रव्यांची फवारणी करणेत येत असून आज अखेर कार्यक्षेत्रातील सोमाटणे, कासारसाई, पवनानगर व मरकळ गटातील मौजे दारूंब्रे, सांगवडे, शिरगांव, धामणे, गोडंब्रे, साळुंब्रे, पाचाणे, उर्से, कासारसाई, नेरे, कडधे, ब्राम्हणोली, येळसे महागाव, काले, मरकळ या गावातील 230 एकर ऊस क्षेत्रावर ड्रोनव्दारे फवारणी करणेत आलेली आहे. नुकतेच मरकळ येथे कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारीत ऊस लागवड क्षेत्रावर ड्रोनद्वारे वसंत उर्जा, मल्टी मायक्रोन्युट्रेट व १३:०:४५ ची फवारणी करण्यात आली. या प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे, माजी संचालक राजाराम लोखंडे, बाळासाहेब लोखंडे, नवनाथ लोखंडे, शंकर लोखंडे तसेच खेड गटातील शेतकी विभागातील कर्मचारी उपस्थित होते.