Pune : रेल्वे इंजिनमध्ये आता एआय कॅमेरे!

पुणे – रेल्वे इंजिनिसह रूळ आणि आसपासच्या हालचालींवर आता हाय डेफिनेशन, हाय रिझोल्युशनच्या एआय कॅमेऱ्यांची करडी नजर असणार आहे. पुणे विभागातील ७७ प्रवासी इलेक्ट्रिक, डिझेल इंजिनमध्ये कॅमेरे बसविण्यात येणार असून, ते ३६० अंशांच्या कोनातून प्रत्येक गोष्ट टिपणार आहेत. या कॅमेऱ्यांमुळे अपघात किंवा अन्य घटनेचे कारण सहज शोधता येईल आणि प्रवास आणखी सुरक्षित होईल.
प्रत्येक इंजिनमधील दोन्ही बाजूच्या चालक केबिनमध्ये प्रत्येकी एक, तर इंजिनच्या बाहेर चार आणि त्याच्या बाजूला एक अशा प्रकारे एका इंजिनमध्ये सहा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे रूळ, रेल्वे क्रॉसिंगसह परिसरातील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवता येईल. प्रत्येक प्रवासाचे रेकाॅर्डिंग होणार असून, कॅमेऱ्यांमधील रेकॉर्डिंग पूर्णपणे ऑफलाइन मोडमध्ये असेल. त्यामुळे हॅकिंगचा प्रकार होणार नाही. आपत्कालीन परिस्थितीचे तपासावेळी महत्त्वाचे इनपूट मिळेल, तसेच ड्यूटीवर असताना लोकोपायलट काय करतात, याचीही माहिती मिळणार आहे.
काय होणार बदल?
– चालकाचे वर्तन, कामाची पद्धत, ताण किंवा अडथळा टिपणार
– रेल्वे रूळ, सिग्नल, रेल्वे फाटक, ट्रॅकवरील अनियमित हालचाली
-आसपासच्या परिसरातील हालचालींवर लक्ष
– संपूर्ण प्रवासाचे ऑफलाइन रेकाॅर्डिंग
– आपत्कालीन परिस्थितीतील महत्त्वाचे इनपूट मिळणार
‘रेल्वे आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे विभागातील सर्व इलेक्ट्रिक आणि डिझेल इंजिनमध्ये एआय कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदाप्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे.’-हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे पुणे.





