अहमदनगर – विद्यापीठात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कामबंद

राहुरी – जुनी पेशन योजना लागू करण्यासाठी राज्यसरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, मुंबई या संघटनेशी सलग्न असलेल्या महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कर्मचारी समन्वय संघ यांनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात नवीन पेन्शनमध्ये (एन.पी.एस.) समाविष्ठ असलेले हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत.
आज झालेल्या आंदोलनात या कर्मचाऱ्यांनी पदव्युत्तर महाविद्यालयापासून प्रशासकीय इमारतीपर्यंत भव्य रॅली काढली. या ठिकाणी कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी एकच मिशन-जुनी पेन्शन अशा घोषणा दिल्या. त्यानंतर सर्व कर्मचारी बाईक रॅलीने राहुरी येथे गेले. त्या ठिकाणी तहसील कार्यालयात प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांनी निवेदन स्वीकारले. हे आंदोलन महात्मा फुले कृषि विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. चिंतामणी देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी समन्वय संघाचे उपाध्यक्ष डॉ. उत्तम कदम, कार्याध्यक्ष डॉ. संजय कोळसे, उपाध्यक्ष दत्तात्रय कदम, बाबासाहेब अडसुरे, पाडुरंग कुसळकर, सचिव देवीदास घाडगे, महिला प्रतिनिधी शीतल जगदाळे, रेखा गोसावी, माधुरी औताडे, डॉ. प्रकाश मोरे, देवेंद्र वंजारे आदींसह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. विद्यापीठाच्या दहाही जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी तेथील प्रमुख अधिकाऱ्यांनी संपाबाबतचे निवेदन दिले. संपूर्ण दिवसभर ठिय्या आंदोलन केले.





