पाथर्डी : मला लोकांनी निवडून दिले असून माझा तांत्रिकदृष्ट्या पराभव झाला आहे . जिथे सर्वसामान्य गोरगरिबांना त्रास होईल, तिथे सर्वात पहिले प्रताप ढाकणे खंबीरपणे उभा राहणार आहे. मस्तवाल झालेल्या ठेकेदारांना व दादागिरीला चोख उत्तर देणार आहे. भविष्यात मी तुमचा आमदार म्हणून लढणार आहे .सर्वसामान्यांच्या हक्काच्या आड कोणी येणार असेल तर त्याला सुट्टी नाही, असा सज्जड दम ॲड. प्रताप ढाकणे यांनी विरोधकांना दिला. शहरातील वीर सावरकर मैदानात आयोजित आभार सभेदरम्यान ढाकणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार रोहित पवार, पारनेरच्या उमेदवार राणी लंके, योगिता राजळे, राजेंद्र दौंड, बंडू बोरुडे, अर्जुन धायतडक, सविता भापकर, आम आदमीचे सुभाष केकान, शिवसेनेचे सचिन नागापुरे , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासीर शेख , राजाजी बुधवंत, वसंत खेडकर, शिवशंकर राजळे आदी उपस्थित होते. ढाकणे म्हणाले, मुंबई येथे पक्षाने घेतलेल्या बैठकीत राज्यातील नेत्यांनी निवडणुकीतील गैरप्रकाराबाबत मांडलेला लेखाजोखा धक्कादायक होता. निवडणुकीत घडलेला प्रकार महाराष्ट्रवर घाला घालणारा आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात चार महिन्यांपूर्वी चमत्कार झाला .लोकसभेनंतर 15064 बाळ जन्माला आली व चार महिन्यांतच 18 वर्षाची होऊन मतदार झाली. याबाबत सर्व पुरावे आमच्याकडे आहे. निकाल लागल्यापासून दररोज हजारो लोक मला भेटत आहेत. मी पडलो की जिंकलो हेच कळेना झाले आहे. लबाडी करून निवडून आलेल्या प्रतिनिधीच्या विरोधात एक लाख 65 हजार लोकांनी मतदान केले आहे. भविष्यात पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील एक लाख 65 हजार लोकांचा आमदार म्हणून मी लढणार आहे .आम्ही गरीब माणसासाठी गुंडा आहोत हे लक्षात ठेवा. सत्तेवर दाब निर्माण करण्याचे काम विरोधकांचे आहे, ते काम मी करणार आहे. आ . रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्रात भाजपने ईव्हीएमसह जातीवादाचा धर्मवादाचा डेंजर व्हायरस पसरवला आहे.या मतदारसंघात वातावरण पाहून प्रताप ढाकणे आमदार होतील असं वाटत होते. सर्व संस्थांचा सर्वेही त्यांच्या बाजूने होता. आपण हरलो, असे भाजपलाही वाटत होते. लोकांचा स्वाभिमान विकत घेण्यासाठी भाजपने प्रत्येक मतदारसंघात 30 कोटी रुपये पाठवले. पोलीस प्रशासनाचा अधिकाऱ्यांचा गैरवापर केला. गुंडांचा वापर करून दबावतंत्र आणले. या निवडणुकीत सर्व ईव्हीएम मशीन गुजरातवरून आणल्या गेल्या. ज्या कंपनीने मशीन बनवले त्याचे डायरेक्टर भाजपचे खासदारआहे. ईव्हीएमची गडबड करून रडीचा डाव खेळून निवडून आलेल्या उमेदवारांना मिरवणुका किंवा विजयी सभा घ्यायला सुद्धा नैतिकता राहिली नाही. महाराष्ट्रात 95 मतदारसंघात मतमोजणीवेळी आकडेवारीमध्ये तफावत निघाली आहे.शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातही तफावत आढळली आहे. याबाबत आमचा अभ्यास सुरू आहे. ईव्हीएम मशीनविरोधात आम्ही लढा उभारणार आहोत व यशस्वी होणार आहोत. तुम्ही काळजी करू नका, तुमच्या दिल्लीतल्या प्रश्नासाठी खासदार निलेश लंके व राज्यातील प्रश्नासाठी मी अशा आम्ही दोघे खंबीरपणे उभा राहून तुमचे प्रश्न सोडवू, अशी ग्वाही पवारांनी दिली.