अहमदनगर – पाथर्डीत दुचाकी चोरास पकडले

पाथर्डी : एसटी बसस्थानकावर पाकीटमारी करणाऱ्या व दुचाकी चोरणाऱ्या एका आरोपीस आज भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे व त्याच्या सहकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. राहुल आजिनाथ शिंदे (रा. चिंचपूर इजदे) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडे शहरातून चोरलेली एक दुचाकी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. शहरातील युवक किरण पुरी याची एक महिन्यांपूर्वी दुचाकी चोरीस गेली होती. चोरून नेलेली ही दुचाकी गर्जे यांच्या शेवगाव रोड लगत असलेल्या कार्यालयासमोर आज लावलेली पुरी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गर्जे यांना या संदर्भात माहिती दिली. या दुचाकीला बनावट नंबर प्लेटसुद्धा लावण्यात आलेली होती.
या दुचाकीवर गर्जे यांच्यासह त्यांचे मित्र मुकुंद गर्जे, पुरी हे लक्ष ठेऊन होते. थोड्यावेळाने शिंदे हा दुचाकी नेण्यासाठी आला असताना गर्जे व त्यांच्या मित्रांनी त्याला हटकले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या वेळी शिंदे याच्यासोबत असलेली एक महिला तेथून गेली. गर्जे यांनी शिंदे याला पोलीस स्टेशनला नेल्या नंतर त्याने आपण दुचाकी चोरल्याची कबुली दिली. शिंदे याच्यावर यापूर्वीच ट्रॅक्टर चोरून नेल्याचा गुन्हा दाखल आहे.
शिंदे याच्या तोंडात मावा होता. पोलिसांनी त्याला मावा थुंकण्यास भाग पडले असता त्याच्या तोंडातून ब्लेडचा एक तुकडा सुद्धा आढळून आला. आज बुधवार हा पाथर्डीचा आठवडे बाजारचा दिवस असून गर्जे यांच्या कार्यालयाशेजारीच बसस्थानक असल्याने शिंदे हा एका महिलेला घेऊन या ठिकाणी पाकिटमारी करण्यासाठी आला होता. शहरात यापूर्वी अनेक दुचाकी चोरीस गेल्या असून या चोरीमध्ये शिंदे या सहभाग आहे का, याचा शोध घेण्याचे काम आता पोलिसांना करावे लागणार आहे.





