जमिनीच्या वादातून मंडलाधिकारी कार्यालयातच भिडले दोन गट

श्रीगोंदा – जमिनीच्या वादातून दोन गट थेट मंडलाधिकारी कार्यालयातच एकमेकांना भिडल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील कोळगाव येथे मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बेलवंडी पोलीस ठाण्यात पीडित महिलेकडून मारहाण तसेच छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, महसूल विभागाकडून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याऐवजी एनसी गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी मच्छिंद्र सुभाष झेंडे, राहुल गौतम भोसले, अशोक मुकिंदा भदार्गे, नवनाथ मुकिंदा भदार्गे, सुमन मुकिंदा भदार्गे यांच्यासह इतर सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
कोळगाव येथील मंडलाधिकारी कार्यालयात मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चिखली येथील जमिनीच्या नोंदीवरून सुनावणी सुरू असताना चिखली येथील दोन गटापैकी मच्छिंद्र सुभाष झेंडे, राहुल गौतम भोसले, अशोक मुकिंदा भदार्गे, नवनाथ मुकिंदा भदार्गे, सुमन मुकिंदा भदार्गे यांच्यासह इतर सहा जणांच्या गटाने दुसऱ्या गटावर हल्ला केला.
लाकडी दांडक्याने सिनेस्टाईल मारहाण सुरू करत पीडित महिलांसह एकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत, लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत पुन्हा पाहून घेण्याची धमकी दिली. या मारहाणीत लाकडी दांडक्याने मारहाण झाल्याने तरुण गंभीर जखमी झाला.या प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच अनेकांनी मंडलाधिकारी कार्यालयासमोर गर्दी केली होती.





